जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांची माहिती देणारी कार्यशाळा खेंड कांगणेवाडी येथे संपन्न
- by Yogesh Bandagale
- December 17, 2025
- 67 views
चिपळूण : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालय व जिल्हा उद्योग केंद्र, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सुशिक्षित युवक-युवती व नागरिकांना जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्याच्या उद्देशाने बुधवार, दि. १७ डिसेंबर रोजी श्री. आनंदराव पवार कॉलेज, खेंड कांगणेवाडी येथे सकाळी ११ वाजता माहिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत उद्योग निरीक्षक श्रीमती सपकाळ मॅडम यांनी उपस्थित युवक-युवती व नागरिकांना जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच विविध योजनांमधील गुंतवणूक, अनुदान, कर्जप्रक्रिया यासह उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेले संपूर्ण मार्गदर्शन त्यांनी केले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत युवक-युवती व नागरिकांना स्वतःचे उद्योग-धंदे सुरू करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमप्रसंगी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाचे चेअरमन श्री. मल्लेश लकेश्री यांनी आपल्या मनोगतात देशातील तरुण युवक-युवती हे देशाचे बलस्थान असल्याचे नमूद करत, नोकरीच्या मागे न लागता रोजगार निर्मितीकडे वळण्याचे आवाहन केले. तर श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष श्री. सिद्धेश लाड यांनी उद्योग निरीक्षक श्रीमती सपकाळ मॅडम यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आभार व्यक्त केले.
या कार्यशाळेमुळे उपस्थित युवक-युवती व नागरिकांना शासनाच्या उद्योगविषयक योजनांची सखोल माहिती मिळाली असून, स्वयंरोजगार व उद्योजकतेकडे वळण्यासाठी त्यांना निश्चितच प्रेरणा मिळाली आहे.
