तर आम्ही कंपनी ताबडतोब बंद करू
- by Yogesh Bandagale
- December 24, 2025
- 428 views
'लक्ष्मी ऑरगॅनिक'बाबत पालकमंत्र्यांचे स्पष्टीकरण
चिपळूण, दि. २४ (प्रतिनिधी) : लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीसंदर्भात समाज माध्यमांवर आणि जनतेमध्ये पसरलेल्या चर्चा व अफवांवर राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा बुधावारी सविस्तर स्पष्टीकरण दिले.
पालकमंत्री सामंत म्हणाले की, “मी लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीबाबत माझी भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. पी-फास (PFAS) या घातक रसायनाचे उत्पादन येथे होत नाही. कंपनीने फक्त ट्रायल बेसिसवर प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचे विघटन कुठे झाले, हे मी स्पष्ट केले आहे. जनतेच्या भावना मला आदर आहेत; मात्र, सोशल मीडियावर विनाकारण चुकीची माहिती पसरवणे सुरू आहे. ज्या लोकांकडे तांत्रिक माहिती नाही, त्यांनीच चुकीच्या अफवांमुळे मला बदनाम करण्याचे काम सुरू केले आहे,” असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत पुढे म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी पर्यावरण निरीक्षणासाठी सात सदस्यीय टीम कंपनीच्या ठिकाणी चौकशीसाठी आली होती. मी या टीमला स्पष्टपणे सांगितले की, जर कुठेही घातक रसायन तयार करण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही कंपनी ताबडतोब बंद करू. तरीही, काही लोक सोशल मीडियावर किंवा अफवा पसरवून गैरसमज निर्माण करत आहेत, हे मला समजत नाही. या कंपनीमध्ये कुठल्याही प्रकारचे पी-फासचे उत्पादन होत नाही, आणि जर झालंच, तर कंपनी बंद करणे निश्चित आहे.”
पालकमंत्री यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे देखील स्पष्ट केले की, काही लोकांचा हेतू कंपनीवर नाही, तर पालकमंत्र्यांना त्रास देणे हा आहे, हे देखील समजून घेणे कठीण आहे.
उदय सामंत म्हणाले की, “जनतेच्या भावना मला मान्य आहेत आणि त्या जपल्या जातील. मात्र तांत्रिक माहिती नसलेल्या लोकांनी अफवा पसरवणे थांबवले पाहिजे. कंपनीचे कामकाज सुरक्षित असून, पर्यावरणीय नियमांचे पालन केले जात आहे.”
पालकमंत्री सामंत यांचा हा संवाद चिपळूण दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी साधलागेला. त्यांनी स्थानीय रहिवाशांना आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना आश्वस्त केले की, लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीत कोणताही घातक रसायन उत्पादन होत नाही, झालेच तर कंपनी बंद करणे निश्चित आहे.
