जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने १५ मार्च रोजी लांजा येथे शासकीय योजनांचा महामेळावा

रत्नागिरी, दि. ११ (जिमाका) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या नालसा मॉडेल अंतर्गत शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व उपक्रमांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी तसेच पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ वितरित करता यावा, यासाठी लांजा येथे शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात येत आहे.

हा महामेळावा दि. १५ मार्च रोजी लांजा येथील श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे आयोजित करण्यात येणार आहे.

महामेळाव्याच्या नियोजनासंदर्भात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव यांनी आज जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. अंबाळकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र पाटील यांनी महामेळाव्याची रूपरेषा सादर केली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव यांनी सांगितले की, पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महामेळावा पार पडणार आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांच्या योजना, त्यांची माहिती आणि लाभ यांचा एकत्रित लाभ नागरिकांना या उपक्रमातून मिळणार आहे.

महामेळाव्यात प्रत्येक विभागाने आपल्या योजनांची सविस्तर माहिती देण्याबरोबरच प्रचार-प्रसिद्धी करावी, विशेषतः ऑनलाईन सायबर फसवणूक, ग्राहक फसवणूक आदींपासून नागरिकांनी कशी दक्षता घ्यावी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभही या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे.

सर्व संबंधित विभागांनी आपल्या योजनांची माहिती व लाभार्थ्यांसह या महामेळाव्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. जाधव यांनी केले आहे.

संबंधित लेख