‘खेळ पैठणीचा’चा बक्षीस समारंभ २६ जानेवारीला
- by Yogesh Bandagale
- January 07, 2026
- 44 views
चिपळूण : सह्याद्री निसर्ग मित्र संस्था व नाटक कंपनी चिपळूण यांच्या सहकार्याने चिपळूण नगर परिषदेच्या वतीने प्लास्टिक मुक्तीसाठी महिलांचा सहभाग वाढावा यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ या उपक्रमाचा एकत्रित बक्षीस समारंभ सोमवार, दिनांक २६ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे होणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली.
या स्पर्धेत सलग तीन महिने महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या कालावधीत स्पर्धेतील विजेत्या महिलांना पैठणी देऊन गौरविण्यात येणार होते. मात्र निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बक्षीस समारंभ पुढे ढकलण्यात आला होता. आता तीन महिन्यांचा एकत्रित बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
गेल्या तीन महिन्यांत सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेकडे रिसायकलिंगसाठी सर्वाधिक प्लास्टिक जमा करणारी महिला, सर्वाधिक महिलांना सहभागी करून घेणारी महिला, तसेच लकी ड्रॉद्वारे निवडलेल्या एका महिलेला पैठणी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय उपस्थित महिलांना प्रत्यक्ष ‘खेळ पैठणीचा’ खेळता येणार आहे.
या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत उपस्थित राहणार असून, कार्यक्रम नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
तसेच सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे संचालक भाऊ काटदरे, नाटक कंपनी चिपळूणचे अध्यक्ष मानस संसारे, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक व नगरसेविका यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
प्लास्टिक मुक्त शहरासाठी महिलांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी ठरत असून पर्यावरण जनजागृतीसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
