चिपळूण येथील समृद्धी पाटीलचे कंपनी सेक्रेटरी (CS) परीक्षेत यश

चिपळूण : शहरातील ॲड. संजय पाटील व ॲड. स्नेहल पाटील यांची कन्या समृद्धी पाटील हिने अलीकडेच जाहीर झालेल्या कंपनी सेक्रेटरी (CS) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

देशातील कठीण परीक्षांपैकी एक मानल्या जाणाऱ्या कंपनी सेक्रेटरी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. ही परीक्षा The Institute of Company Secretaries of India (ICSI) मार्फत घेतली जाते. या परीक्षेचा दर्जा ‘सीए’ परीक्षेइतकाच आव्हानात्मक मानला जातो. विशेष म्हणजे, समृद्धीने ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करून आपल्या जिद्दीची आणि परिश्रमांची प्रचिती दिली आहे.

आपल्या यशाबद्दल बोलताना समृद्धी म्हणाली, “माझ्या कुटुंबाचा भक्कम पाठिंबा असल्यामुळेच मी ही परीक्षा देऊ शकले. माझ्या शिक्षकांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले. दररोज दहा ते बारा तास अभ्यास करून सातत्य राखले. स्वतःच्या नोट्स तयार करण्यावर विशेष भर दिला. यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली.”

सीएस म्हणून काम करताना कायद्याचे सखोल ज्ञान आवश्यक असते. यासाठी तिला आई-वडिलांकडून विशेष प्रेरणा मिळाली. दोघेही वकील असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाचा तिला मोठा फायदा झाला. सीएसच्या अभ्यासासोबतच तिने ‘लॉ’चे शिक्षणही पूर्ण केले असून तीनही वर्षांत डिस्टिंक्शन मिळवले आहे. सध्या ती चौथ्या वर्षात शिक्षण घेत आहे.

कंपनी सेक्रेटरी कोर्स पूर्ण केल्यानंतर विविध नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदांवर कार्य करण्याची संधी उपलब्ध होते. काही काळ अनुभव घेतल्यानंतर पुण्यासारख्या शहरात स्वतःचे कार्यालय सुरू करण्याचा मानस समृद्धीने व्यक्त केला आहे.

मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर मिळवलेल्या या यशाबद्दल समृद्धीचे सर्व स्तरांतून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

संबंधित लेख