पुणे महापालिका प्रभाग ३ची जबाबदारी निहार कोवळे यांच्याकडे
- by Yogesh Bandagale
- January 09, 2026
- 1338 views
चिपळूण : राज्यातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत युवासेना तालुकाप्रमुख तथा चिपळूणचे नगरसेवक निहार कोवळे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ३ मध्ये शिवसेना पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी निहार कोवळे यांच्याकडे देण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत असून, या निवडणुकीत शिवसेना पक्ष स्वतंत्रपणे लढत आहे. प्रभाग क्रमांक ३ मधून शिवसेना पक्षाच्या नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. गायत्री हर्षवर्धन पवार यांच्या प्रचाराचे नियोजन, समन्वय व अंमलबजावणीची जबाबदारी निहार कोवळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. चिपळूण नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निहार कोवळे जायंट किलर ठरले होते. अनुभवी शैलेश टाकळे यांच्यावर मात करीत त्यांनी या निवडणुकीत विजयी मिळविला आहे.
युवासेनेतील सक्रिय नेतृत्व, संघटन कौशल्य आणि निवडणूक व्यवस्थापनाचा अनुभव लक्षात घेऊन पक्ष नेतृत्वाने निहार कोवळे यांची या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी निवड केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक ३ मध्ये शिवसेनेचा प्रचार अधिक प्रभावीपणे राबविला जाईल, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
