महिला पोलीसांना जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टीकोन देणारी कार्यशाळा
- by Yogesh Bandagale
- December 24, 2025
- 48 views
– पोलीस अधीक्षक नितीन बगाटे
रत्नागिरी, दि. २४ (जिमाका) :
महिला आपल्या संसाराची जबाबदारी, नोकरीचे कर्तव्य तसेच मुलांचे संगोपन अशा अनेक जबाबदाऱ्या एकाच वेळी समर्थपणे पार पाडत असतात. या धावपळीत स्वतःसाठी वेळ काढणे अनेकदा शक्य होत नाही आणि त्यामुळे मानसिक ताण निर्माण होतो. अशा परिस्थितीत जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टीकोन देणारी ही कार्यशाळा महिला पोलीसांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांनी केले.
महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ताणतणावाचे नियोजन व जीवन कौशल्य या विषयावर आज जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक सौ. राधिका फडके तसेच कार्यशाळेच्या मार्गदर्शक डॉ. अरुंधती भालेराव उपस्थित होत्या.
पोलीस विभागात कार्यरत असताना अनेकदा नकारात्मक घटना पाहायला व ऐकायला मिळतात. मात्र, अशा परिस्थितीतही नकारात्मकतेला बाजूला सारून संयमाने व सकारात्मकतेने काम करणे आवश्यक आहे, असे श्री. बगाटे यांनी सांगितले. पोलीस स्थानकात येणारी प्रत्येक व्यक्ती ही अडचणीत किंवा मानसिक तणावात असते. त्या व्यक्तीशी संवेदनशीलतेने व चांगल्या वागणुकीने संवाद साधणे ही पोलीसांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पोलीसांचे जीवन अत्यंत धकाधकीचे असल्याने महिला पोलीसांना कुटुंब आणि कर्तव्य यांचा समतोल राखताना स्वतःचे मानसिक स्वास्थ्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आनंद सोहळा, संवाद आणि विविध खेळांच्या माध्यमातून ताणतणावाचे नियोजन कसे करता येते, याबाबत मार्गदर्शन करताना डॉ. अरुंधती भालेराव यांनी सांगितले की, अशा उपक्रमांचा दैनंदिन जीवनात निश्चितच सकारात्मक परिणाम होतो.
या कार्यशाळेला जिल्ह्यातील महिला पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
