आफळेबुवांचे आवेशपूर्ण कीर्तन; दुष्टांशी वागण्याचा आणि पानिपताचा अर्थ उलगडला
- by Yogesh Bandagale
- January 15, 2026
- 67 views
चिपळूण, दि. १४ : मकरसंक्रांतीचा पवित्र दिवस आणि पानिपत स्मरणदिनाचे औचित्य साधून श्री स्वामी चैतन्य परिवार आयोजित कीर्तनमालेतील तिसरे पुष्प आज भाविकांच्या साक्षीने अत्यंत आवेशपूर्ण आणि विचारप्रवर्तक वातावरणात संपन्न झाले. यावेळी ह.भ.प. आफळेबुवांनी दुष्ट प्रवृत्तीशी कसे वागावे, याबाबत सखोल विवेचन करताना “आपण प्रबळ असलो तरच दुष्टाचा दुष्टपणा कमी होतो,” असा ठाम संदेश दिला.
कीर्तनमालेच्या पहिल्या दिवसापासून निरुपणासाठी घेतलेल्या “आपुलिया हिता जो असे जागता” या अभंगातील “गीता भागवत करिती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे” या ओळी केंद्रस्थानी ठेवून आजच्या पूर्वरंगाची मांडणी करण्यात आली. भगवद्गीतेतील “समः शत्रौ च मित्रे च” या श्लोकाचा अर्थ उलगडताना आफळेबुवांनी सांगितले की, शत्रू आणि मित्राशी व्यवहार समान ठेवावा, असा त्याचा सरधोपट अर्थ नाही. श्रीकृष्णांनीही जशास तसे या न्यायानेच व्यवहार केला. मान देणाऱ्याला मान आणि अपमान करणाऱ्याला तसाच प्रत्युत्तर दिले. भक्तीयोगाच्या संदर्भात या श्लोकाचा अर्थ शत्रू आणि मित्रावर समान प्रेम असावे, मात्र व्यवहार त्यांच्या वागणुकीनुसार वेगवेगळा असतो, असा श्रीकृष्णांचा अर्जुनाला संदेश आहे.
दुष्टावर अती दया केल्यास त्याचा दुष्टपणा वाढतो, मात्र कठोरपणे व प्रबळपणे वागल्यास तो कमी होतो, हे स्पष्ट करताना आफळेबुवांनी ‘सवतीचे प्रेम’ ही लोककथा सांगून रसिकांना अंतर्मुख केले. दुबळेपणा दुष्ट प्रवृत्तीला अधिक बळ देतो, त्यामुळे सामर्थ्यवान व्हा, असा स्पष्ट संदेश देत त्यांनी पूर्वरंगाची सांगता केली.
उत्तररंगात पानिपतच्या लढाईच्या आख्यानाला सुरुवात करताना बुवांनी बाजीरावांच्या युद्धनीतीची आठवण करून दिली. ती नीती विसरली गेली, हीच पानिपतच्या पराभवाकडे नेणारी पहिली चूक ठरल्याचे त्यांनी सांगितले. १७५६ पासून अब्दालीच्या स्वाऱ्या सुरू होत्या. त्याच काळात भारतातील लोक दुसऱ्यांवर विसंबून राहू लागले आणि त्याचा फायदा नजीबखानाने घेतला. तरीही रघुनाथरावांनी मराठी सैन्य घेऊन अब्दालीला पळवून हिंदवी स्वराज्याचा झेंडा अटकेपार फडकवला. पुढे मथुरेत शिंदेशाही मोडण्यासाठी झालेल्या संघर्षात “बचेंगे तो और भी लढेंगे” असे म्हणत दत्ताजी शिंदे वीरमरण पावले.
पानिपतच्या प्रवासातील दुसरी मोठी चूक म्हणजे गरज भासेल म्हणून आधीच तयारीनिशी उपस्थित न राहणे, हे इतर प्रांतांनी केले नाही, असेही बुवांनी नमूद केले. दिल्लीचे तख्त वाचवण्यासाठी वारंवार महाराष्ट्रातूनच मदत गेली, म्हणूनच “दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा” हे अभिमानाने सांगितले जाते, असे त्यांनी ठासून सांगितले.
यानंतर सदाशिवरावभाऊ आणि विश्वासराव यांच्या नेतृत्वाखाली पुणे ते दिल्ली हा कठीण प्रवास, सैन्याचा लवाजमा, आवश्यक साधनसामग्री आणि परिस्थितीचे गांभीर्य बुवांनी जिवंत शब्दांत मांडले. माळव्यापर्यंत अब्दालीने जिंकलेली ठाणी परत मिळवत भाऊ दिल्लीला पोहोचले. लाल किल्ल्यात औरंगजेबाच्या सिंहासनाशी जाऊन शिवरायांचे सिंहासन फोडल्याचा अपमान आठवत त्यांनी दरबारातील चांदीचा पत्रा फोडून नऊ लाख चांदीची नाणी पाडली आणि दिल्ली जिंकली. पुढे कुंजपुरा किल्लाही जिंकण्यात आला. दत्ताजींच्या मृत्यूचा बदला जनकोजींनी कुतुबशहाचा वध करून घेतला.
अब्दालीने मराठी सैन्याची दक्षिणेकडून येणारी मदत अडवल्याने कुंजपुराहून दिल्लीकडे येताना पानिपत येथे युद्ध झाले. त्यामुळे हे युद्ध पानिपतसाठी नव्हे, तर दिल्ली जिंकण्यासाठी होते, असे इतिहास सांगतो, असे आफळेबुवांनी ठामपणे मांडले. दहा वर्षांनी महादजी शिंदेंनी पुन्हा सर्व सत्ता मिळवली आणि दिल्लीच्या तख्ताचे मुतालिक कायम महादजी शिंदेच राहिले. १७६१ नंतर अब्दाली कधीही भारतात परत आला नाही. त्यामुळे पानिपत ही हरण्याची नव्हे, तर अखेरीस जिंकलेलीच लढाई असल्याचा ठोस निष्कर्ष बुवांनी मांडला.
तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत गीता-भागवत श्रवण करून त्याचे आचरण करणाऱ्यांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त करत, “मोठ्यांपेक्षा प्रबळ असणे आवश्यक आहे,” असे विवेचन करून आफळेबुवांनी तिसऱ्या पुष्पाची सांगता केली.
पानिपत हा विषय असल्याने आजचे कीर्तन अत्यंत आवेशपूर्ण झाले. दत्त संप्रदायातील माणिक प्रभूंनी रचलेल्या “दावा नयनी यशोदेचा सुकुमार… सरसावे सेना विजयाला अटकेवर लावली ध्वजा…” अशा अनेक पदांनी आफळेबुवांनी आख्यान रंगवले. एकूणच कीर्तनमालेतील तिसरे पुष्प आजच्या दिनविशेषाला साजेसे ठरले.
