चिपळूणमध्ये ‘कोकणचा साज- संगमेश्वरी बाज’ लोकनाट्याचा उद्या प्रयोग
- by Yogesh Bandagale
- September 23, 2025
- 62 views
चिपळूण : शहरातील कावीळतळी येथील जिल्हाभर प्रसिद्ध असलेल्या ओंकार मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवात आज, बुधवार दि. २४ सप्टेंबर रोजी, रसिकांसाठी हास्य व लोककलांचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. समर्थ कृपा प्रॉडक्शन प्रस्तुत ‘कोकणचा साज – संगमेश्वरी बाज’ हे तुफान विनोदी लोकनाट्य आज रात्री ८ वाजता रंगणार असून, या प्रयोगाची शहरात जवळपास सात वर्षांनंतर पुनरावृत्ती होत असल्याने प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता आहे.
कोकणातील पारंपरिक नमन, भजन, जाखडी या लोककला विनोदी अंगाने मांडत नवीन पिढीकडे पोहोचवण्याचे काम या लोकनाट्याद्वारे केले जात आहे. अखिल भारतीय नाट्य संमेलनात या लोकनाट्याचा प्रयोग रंगला असून, आजवर तब्बल ५०० हून अधिक प्रयोग देशभर झाले आहेत. जुनी जाखडी, बदललेले नमन यांचा समावेश करून हास्याची फुंकर घालत कोकणातील लोकसंस्कृती, परंपरा आणि भूमीची जाणीव करून देण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे.
या लोकनाट्यामध्ये ज्येष्ठ लोककलावंत सुनील बेंडखळे तात्या गावकर ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत. बेंडखळे यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा राज्यस्तरीय ज्येष्ठ लोककलावंत पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर अवली कलाकार सचिन काळे याचेही आकर्षण प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. काळे यांनी ‘एप्रिल-मे ९९’ या चित्रपटात भूमिका केली असून, ते सध्या झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमात झळकत आहेत.
शहरात या प्रयोगाचे पुनरागमन होत असल्यामुळे अधिकारी, पत्रकार, कलाकारांसह विविध क्षेत्रातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. प्रेक्षकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्थेची सोय करण्यात आली आहे. “या मनोरंजनात्मक प्रयोगाचा आनंद घ्या, हसत-खेळत कोकणच्या लोककलांविषयी जाणीव करून घ्या,” असे आवाहन ओंकार मित्र मंडळ नवरात्रोत्सवाच्या वतीने करण्यात आले आहे.
