खाद्य विक्रेत्यांचा नगराध्यक्षांनी विश्वास जिंकला!

 

चिपळूण | प्रतिनिधी: शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र शेजारील चौपाटी परिसरातील खाद्य विक्रेत्यांना महाराष्ट्र हायस्कूल रोडच्या बाजूला तात्पुरते विस्थापित करण्यात आले होते. मात्र या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या सर्व हातगाडी व खाद्य विक्रेत्यांना आता व्ह्यू गॅलरी या ठिकाणी कायमस्वरूपी विस्थापित केले जाणार आहे.
यासंदर्भात बुधवारी सकाळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सुमारे ५०हून अधिक व्यावसायिकांची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना श्री. सकपाळ म्हणाले की, “तुमची कायमस्वरूपी व्यवस्था व्ह्यू गॅलरी येथे करण्यात येणार असून तेथे वीज, पाणी आदी सर्व मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. रामतीर्थ तलावाशेजारी उभारण्यात आलेली सुंदर व्ह्यू गॅलरी या निमित्ताने अधिक खुलून येईल. कोणतीही काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे.”

या ठिकाणी खाऊ गल्लीसारखा आकर्षक व सुव्यवस्थित परिसर विकसित केला जाईल, ज्यामुळे सर्व व्यावसायिकांचा व्यवसाय सुरळीत चालेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या व्ह्यू गॅलरी परिसरात काम सुरू असून येत्या आठ दिवसांत स्वच्छता व आवश्यक तयारी पूर्ण झाल्यानंतर तेथे व्यवसाय सुरू करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.

बैठकीनंतर नगराध्यक्षांसह सर्व व्यावसायिकांनी प्रत्यक्ष व्ह्यू गॅलरी परिसराची पाहणी केली. या वेळी व्यावसायिकांनी काही सूचना मांडल्या असून त्यांचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
या प्रसंगी नगरसेवक कपिल शिर्के, उदय जुवळे, राणी महाडिक, हर्षाली पवार, नीलम जाधव, निहार कोवळे, तसेच शिवसेना उपशहर प्रमुख चव्हाण, निशांत जंगम आदी उपस्थित होते.

संबंधित लेख