सती चिंचघरी प्राथमिक शाळेत क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न
- by Yogesh Bandagale
- December 03, 2025
- 361 views
चिपळूण : सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा, खेर्डी चिंचघरी सती (ता. चिपळूण) यांचा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात व शिस्तीने नुकताच संपन्न झाला. विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांच्या जोशपूर्ण सहभागामुळे हा क्रीडा महोत्सव विशेष ठरला.
क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन चिंचघरी गावच्या सरपंच सौ. अनिता गुरव आणि दैनिक सागर चे प्रतिनिधी श्री. देवेंद्र जाबरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर क्रीडा शपथ, आकाशात दीप सोडण्याचा कार्यक्रम आणि विद्यार्थी संचलनाने वातावरण भारावून गेले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमानेही उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री. देवेंद्र जाबरे यांनी क्रीडेमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारी शिस्त, मनोबल, नेतृत्वगुण याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच शाळेने केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांचे कौतुकही त्यांनी आवर्जून केले.
क्रीडा महोत्सवातील पहिला सामना इयत्ता तिसरी विरुद्ध इयत्ता चौथी — कबड्डी असा झाला. सौ. गुरव व श्री. जाबरे यांच्या हस्ते सामन्याचे उद्घाटन श्रीफळ फोडून करण्यात आले. अटीतटीच्या या सामन्यात इयत्ता चौथीचा संघ विजयी ठरला. त्यानंतर खो-खो, लंगडी, रिले, १०० मीटर धावण्यासह विविध स्पर्धा जोशात पार पडल्या.
या संपूर्ण क्रीडा महोत्सवाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिक्षिका श्रीमती ज्योती चाळके, श्री. संदेश सावंत, सौ. शीतल पाटील, सौ. विनया नटे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अत्यंत तत्परतेने सहकार्य करत महोत्सव यशस्वी केला.
