चिपळूण पालिकेची पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा; त्रिमूर्ती गणेश चित्रशाळा, घरगुती सजावट स्पर्धेत साहिल केरू ठाकरे प्रथम
- by Yogesh Bandagale
- October 14, 2025
- 72 views
चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्यावतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आयोजित पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्तिकार स्पर्धा व पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती घरगुती सजावट स्पर्धा २०२५चे बक्षीस वितरण मंगळवारी सायंकाळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात नृत्य मल्हार कथक अकॅडमीच्या कोमल राणे यांनी सादर केलेल्या गणेश वंदनाने झाली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे भाऊ काटदरे, नाटक कंपनी चिपळूणचे अध्यक्ष मानस संसारे, माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, दीपा देवळेकर, सुनील खेडेकर, माजी नगरसेवक उमेश सकपाळ, रसिका देवळेकर, सीमा चाळके, स्पर्धेचे परीक्षक संतोष केतकर, उद्यान विभागाचे प्रमुख बापू साडविलकर, आरोग्य विभागाचे प्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, पाणीपुरवठा विभागाचे रोहित खाडे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
परीक्षक संतोष केतकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून सांगितले की, पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नगर परिषदेने राबविलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. घरगुती गणेश सजावट करताना पर्यावरण पूरक उपक्रमावर लक्ष देणे महत्त्वाचे असून गणेश मूर्ती पर्यावरण पूरक बनविणाऱ्या मूर्तिकारांसाठी स्पर्धा आयोजित केलेल्या बाबतीत त्यांनी समाधान व्यक्त केले.
पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्तिकार स्पर्धेत प्रथम क्रमांकावर त्रिमूर्ती गणेश चित्र शाळा, मुरादपूर तर द्वितीय क्रमांकावर विजय विष्णू सागवेकर, शंकरवाडी आणि तृतीय क्रमांकावर ओम कला केंद्र ठरले. पर्यावरण पूरक गणेश मूर्ती घरगुती सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांकावर साहिल केरू ठाकरे, द्वितीय क्रमांकावर अक्षय रामचंद्र आग्रे आणि तृतीय क्रमांकावर प्रणित हरिश्चंद्र गोरिवले यांचा गौरव करण्यात आला. तसेच वंदेश किरण चव्हाण, वैभव विलास चव्हाण आणि सुनील मधुकर खेडेकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. उद्यान विभागाचे प्रमुख बापू साडविलकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते, तर शाहीर खेरटकर यांनी कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचालन केले.
या उपक्रमातून कलाकार, विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला आणि नगर परिषदेच्या व सहकारी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नामुळे पर्यावरणपूरक संदेश शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचला.
