देवरूख शहरातील मुख्य रस्ता दिवाळीपर्यंत दुरुस्त; आमदार शेखर निकम यांची ग्वाही
- by Yogesh Bandagale
- September 23, 2025
- 87 views
देवरूख (सुरेश सप्रे) : देवरूख शहराचे प्रवेशद्वार असलेला बाजीराव पेशवे उद्यान–बाजारपेठ ते मुस्लिम मोहल्ला हा मुख्य रस्ता दिवाळीपर्यंत तातडीने दुरुस्त करण्यात येणार असल्याची ग्वाही आमदार शेखर निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिली. ही माहिती शहराध्यक्ष हनिफ हरचिरकर व पंकज पुसाळकर यांनी दिली.
शहरातील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे प्रचंड प्रमाण असून, चोरपऱ्या ते बसस्थानक या मार्गावर रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. या खड्ड्यांमुळे नागरिकांना अपघाताचा धोका संभवत असून, रस्त्यांच्या दुरुस्तीसंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शेखर निकम यांना भेट देऊन निवेदन दिले व चर्चा केली.
आमदार शेखर निकम यांनी यापूर्वी शहरातील अनेक रस्त्यांच्या कामासाठी विविध निधीतून देवरूख नगर पंचायतीला लाखों रुपये मंजूर केले होते. तथापि, पावसाळ्यात शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले आणि त्यावर झालेली मलमपट्टी पावसात वाहून गेल्यामुळे नागरिकांना खड्ड्यांच्या समस्येपासून मुक्तता मिळावी यासाठी पदाधिकाऱ्यांनी उपाययोजना करण्याची मागणी केली.
शिष्टमंडळाचे नेतृत्व शहराध्यक्ष हनिफ हरचिरकर यांनी केले व बाळुशेठ ढवळे, पंकज पुसाळकर, नितीन भोसले, प्रफुल्ल भुवड, बंडू जाधव, दीपक खेडेकर, रविंद्र लाड यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार शेखर निकम यांनी या भेटीत चोरपऱ्या–पंचायत समिती ते एसटी बसस्थानक ते मशिद या मार्गावरील खड्ड्यांचे काम दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. शहरवासियांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार असून, वाहतुकीसाठी हा मार्ग सुरक्षित बनविण्यात मदत होणार आहे.
