लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात ८ जानेवारीला तीव्र आंदोलन
- by Yogesh Bandagale
- January 02, 2026
- 106 views
चिपळूण : लोटे औद्योगिक वसाहतीत उभ्या राहत असलेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरोधात गुरुवार, दिनांक ८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सर्वपक्षीय व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी खासदार हुसेन दलवाई यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना दलवाई यांनी सांगितले की, इटलीमधील ‘मिटेनी’ ही कंपनी मोठ्या प्रमाणावरील प्रदूषणामुळे बंद पाडण्यात आली होती. या कंपनीची संपूर्ण यंत्रसामग्री जशीच्या तशी कोकणात आणण्यात आली असून ती लक्ष्मी ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने खरेदी केली आहे. तसेच मिटेनी कंपनीचे माजी संचालक अँटोनिया नॉरडेनी यांचा लक्ष्मी ऑरगॅनिकमध्ये समावेश असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दलवाई पुढे म्हणाले की, पीएफएएस (कायमचे रसायन) हे मानवी आरोग्यास अत्यंत घातक असून, ते रक्तात मिसळल्यास कॅन्सर, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे तसेच हृदयावर गंभीर परिणाम होऊ शकतात. याशिवाय प्रजनन क्षमतेवरही या रसायनांचे घातक परिणाम होतात, असे विविध वैद्यकीय अहवालांतून स्पष्ट झाले आहे.
असे असतानाही या कंपनीला परवानगी देताना प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी व संबंधित प्रशासनाने या गंभीर बाबींकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप दलवाई यांनी केला.
हा प्रश्न कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून, जनतेच्या आरोग्याचा व भविष्यातील पिढ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पक्षीय मतभेद, हेवेदावे बाजूला ठेवून सर्व नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
या पत्रकार परिषदेला अशोक जाधव, उदय घाग, सुमती जांभेकर, भरत लब्धे, राजन इंदुलकर, संकेत साळवी, महादेव चव्हाण, सुबोध सावंत-देसाई यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
