लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये लवकरच मिळण्याची शक्यता

मुंबई : मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करणाऱ्या राज्यातील लाखो महिलांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. राज्य सरकारने या योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्याच्या हालचालीला गती दिली असून, सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बालविकास विभागाकडे तब्बल 410 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना काही दिवसांतच सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने या संदर्भात अधिकृत शासन निर्णय जारी केला असून, निधीच्या वितरणाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून जुलै 2024 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत महिलांना एकूण १४ हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबरच्या सुरुवातीला देण्यात आला होता. त्यामुळे आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची महिलांमध्ये उत्सुकता असून, शासनाच्या तिजोरीतून निधी वर्ग झाल्यामुळे हप्ता लवकरच खात्यात जमा होईल, अशी अपेक्षा आहे.

या योजनेतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिला लाभार्थी ठरतात. मात्र, या पात्रतेची पडताळणी करण्यासाठी शासनाने ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. लाभार्थी महिलांनी स्वतःच्या आधारकार्डासोबत पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकाची पडताळणी करणे आवश्यक आहे.

महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत सर्व लाभार्थींनी दोन महिन्यांच्या आत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेअंती पात्र महिलांनाच पुढील हप्ते मिळतील.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो महिलांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकीकडे शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना राबवली असताना, दुसरीकडे पारदर्शकतेसाठी ई-केवायसीसारखी प्रक्रिया सुरू करून निधी खरोखर पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, असा प्रयत्न करण्यात येत आहे.

संबंधित लेख