जिल्ह्यात प्रथमच पक्षी मित्र संमेलन उत्साहात

रत्नागिरी, दि. २२ (जिमाका) : वन आच्छादन टिकवून ठेवण्यासाठी कमीत कमी झाडे तोडली जातील याची काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारी आहे. वनांमुळेच पक्ष्यांचा अधिवास सुरक्षित राहतो. पक्षी हे बीजप्रसारक असल्याने निसर्गतः झाडे लावणे, वाढवणे व संवर्धनाची प्रक्रिया तेच करतात. देवराई जपणे आणि पक्ष्यांचा अधिवास पुनर्संचयित करणे यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे आवाहन माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये यांनी केले.

वन विभागामार्फत जिल्ह्यात प्रथमच जिल्हास्तरीय पक्षी मित्र संमेलन येथील हॉटेल कोहिनूर येथे पार पडले. उद्घाटनप्रसंगी मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जितेंद्र रामगावकर, मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कोल्हापूर जी गुरुप्रसाद, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चांदोलीचे क्षेत्रसंचालक तुषार चव्हाण, कराड येथील उपवनसंरक्षक किरण जगताप, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी रणजीत गायकवाड, विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड तसेच जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना श्री. लिमये म्हणाले, झाडे लावणे व पक्ष्यांचे संवर्धन करणे ही केवळ वन विभागाची जबाबदारी नसून विविध संस्था, संघटना व नागरिकांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्यात समृद्ध वनसंपदा असून देवराई, माळराने, पाणथळ क्षेत्रे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांचा वावर आहे. अशा क्षेत्रांची नोंद घेऊन त्यांना वन म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे त्यांनी सांगितले. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करून पक्षी संवर्धनासाठी दबाव गट निर्माण करणेही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्य वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी पक्षी व प्राणी संरक्षणासाठी सर्व घटकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तुषार चव्हाण यांनी भारतात सुमारे १३००, महाराष्ट्रात जवळपास ५०० आणि त्यापैकी २२० स्थलांतरित पक्षी असल्याची माहिती देत कोकण व सह्याद्री परिसर पक्षी अधिवासासाठी महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले. जितेंद्र रामगावकर यांनी या संमेलनातून जिल्ह्यातील विविध पक्षीप्रजातींच्या संवर्धनासाठी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

प्रास्ताविकात गिरिजा देसाई यांनी पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या संकल्पना व मार्गदर्शनातून हे संमेलन प्रथमच आयोजित केल्याचे सांगितले. रत्नागिरी जिल्ह्याला १६७ कि.मी.चा विस्तीर्ण समुद्रकिनारा व सह्याद्री पर्वतरांगा लाभल्या असून सुमारे ३५० हून अधिक पक्षीप्रजाती येथे आढळतात. जिल्ह्याचे नाव निसर्ग व पक्षी पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे त्यांनी नमूद केले.

महाधनेश ‘फ्लॅगशीप स्पेसीज’ म्हणून घोषित
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून ‘ग्रेट इंडियन हॉर्नबिल’ अर्थात महाधनेश या पक्ष्याला जिल्ह्याची ‘फ्लॅगशीप स्पेसीज’ म्हणून घोषित करण्यात आले. या पक्षाच्या चार प्रजाती जिल्ह्यात आढळतात. त्यामुळे वन पर्यटन व जैवविविधता संवर्धनासाठी या घोषणेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व वृक्षारोपणाने झाली. राज्यभरातील पक्षी निरीक्षक, संशोधक, अभ्यासक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व वन विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख