हातीव पंचायत समिती गणातील जनता सूज्ञ; विखारी प्रचाराला बळी पडणार नाही: मंगेश बांडागळे

देवरुख (प्रतिनिधी) : देवरुख संगमेश्वर तालुक्यातील हाती पंचायत समिती गणातून आपण महायुतीकडून अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला असून आपल्या विरोधात काही लोकांकडून जाणीवपूर्वक विखारी व दिशाभूल करणारा प्रचार केला जात असल्याचा आरोप उमेदवार मंगेश बांडागळे यांनी केला आहे.

मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, निवडणुकीत समाजाचा राजकारणासाठी गैरवापर केला जात आहे, मात्र आपण नेहमीच विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवला आहे. आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून हाती परिसरात विविध विकासकामे मार्गी लावण्यात आली असून त्याचा लाभ थेट जनतेला झाला आहे.

“लोकांना कुणीही कितीही चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला तरी हाती पंचायत समिती गणातील जनता विकासाच्या बाजूनेच मतदान करेल. येथील नागरिक सूज्ञ असून ते अशा विखारी व अपप्रचाराला बळी पडणार नाहीत,” असा ठाम विश्वास मंगेश बांडागळे यांनी व्यक्त केला.

विकासकामांच्या जोरावर आणि जनतेच्या विश्वासावर ही निवडणूक लढवत असून लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
 
 

संबंधित लेख