जितेंद्र उर्फ पप्या चव्हाण यांचा शिंदे गटात प्रवेश
- by Yogesh Bandagale
- January 07, 2026
- 573 views
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील रामपूर जिल्हा परिषद गटाचा शिवसेना मेळावा बुधवारी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात आमदार भास्करशेठ जाधव यांचे जवळचे सहकारी, चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती जितेंद्र उर्फ पप्या चव्हाण यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला.
जितेंद्र चव्हाण यांच्यासोबत माजी उपतालुकाप्रमुख महादेव मोरे, विद्यमान उपतालुकाप्रमुख लक्ष्मण कोकमकर, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख अक्षता साळवी, रामपूर महिला आघाडी प्रमुख डॉ. वर्षा चव्हाण, पंचायत समिती सदस्य अनुजा जितेंद्र चव्हाण, मागील विभागप्रमुख अनिल साळवी, रामपूरच्या विद्यमान सरपंच अमिता अशोक चव्हाण, तसेच आजी–माजी सरपंच, शाखाप्रमुख आणि सुमारे ४०० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी सर्वांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना जितेंद्र चव्हाण म्हणाले, “मी विकासकामांसाठी पालकमंत्र्यांना भेटायला गेलो होतो. याबाबत आमदार भास्कर शेठ जाधव यांनी विचारणा केली असता मी स्पष्ट सांगितले. मात्र दुसऱ्याच दिवशी माझी हकालपट्टी झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. यावरून पक्ष नेमका कोण चालवतो, निर्णय कुठून होतात, असा प्रश्न निर्माण होतो. मी २७ वर्षे पक्षासाठी काम केले. आमदार भास्कर जाधव चार वेळा निवडून येण्यासाठी आम्ही छातीचा कोट करून लढलो. मात्र त्याची किंमत राहिली नाही. त्यामुळे आता मी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहे.”
यावेळी त्यांनी बचत गटांसाठी ग्रामसंघाची इमारत उभारून द्यावी, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांकडे व्यक्त केली.
पालकमंत्री ना. उदय सामंत म्हणाले, “तुम्ही शिवसेनेत आलात याचा तुम्हाला पश्चाताप होणार नाही, याची मी खात्री देतो. विकासकामांसाठी भेट दिल्यामुळे हकालपट्टी होणे, हीच आजची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. जुना–नवा असा वाद करू नका. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये इच्छुक जास्त असतात; उमेदवारी न मिळाल्याने राग धरू नका, एकसंघपणे काम करा.”
ते पुढे म्हणाले, “आचारसंहिता संपल्यानंतर ग्रामसंघाच्या इमारतीसाठी जिल्हा नियोजनमधून २५ लाख रुपये देण्यात येतील.” तसेच पक्ष वाढताना वाद होतात, मात्र नेते एकनाथ शिंदे, चिन्ह धनुष्यबाण हे लक्षात ठेवून विकासासाठी काम करा, असे आवाहन त्यांनी केले.
या मेळाव्यास माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी सभापती बाळशेठ जाधव, संदीप सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश घाग, गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनोद झगडे, राकेश शिंदे, चिपळूण नगरपालिकेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, नगरसेवक निहार कोवळे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य ऋतुजा खांडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
