पेढेतील तरुणांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
- by Yogesh Bandagale
- January 03, 2026
- 224 views
चिपळूण : चार दिवसांपूर्वी पेढे मोरेवाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केल्यानंतर, आज पेढे गावातील तरुण कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रणजित (संदेश) मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश पार पडला असून, माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी सर्व नव्या कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.
माजी आमदार सदानंद चव्हाण आणि पेढे ग्रामस्थ यांचे अनेक वर्षांपासून अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असून, ग्रामस्थांनीही ते आजवर जपले आहेत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी पेढे मोरेवाडी येथील ग्रामस्थांनी सदानंद चव्हाण यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले होते तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय जाहीर केला होता. यानंतर सदानंद चव्हाण यांनी विविध राजकीय पक्षांमध्ये कार्यरत असलेल्या शिवसैनिकांना पुन्हा शिवसेनेत परत येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला आता सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे.
आज झालेल्या जाहीर प्रवेशात ग्रामपंचायत सदस्य रणजित मोरे यांच्यासह अनिकेत पाणकर, रुपेश बांद्रे, रोहित तांबिटकर, पार्थ मोरे, कल्पेश मोरे, आर्यन कदम, प्रेषित मोरे, आकाश जाधव, महेंद्र धाडवे, योगेश धाडवे, तेजस धाडवे, प्रमोद मोरे, तेजस जाडे, मनीष मोरे, अथर्व मोरे, दिनेश मोरे, आदेश मोरे, रोहित जाधव, राजेश मोरे, रुपेश मोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी तालुका प्रमुख संदेश बापू आयरे, समन्वयक दिलीप चव्हाण, पंचायत समितीचे माजी गटनेते राकेश शिंदे, चिपळूण नगरपरिषदेचे गटनेते अंकुश आवले, विभागप्रमुख अजय कदम, विभाग संघटक जनार्दन मालवणकर, अनिल शिंदे, दयानंद जुवळे, पुष्कर चव्हाण, युवासेनेचे सुचय शिंदे, अनिकेत शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या तरुणांच्या प्रवेशामुळे पेढे गावातील शिवसेना अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे. पक्षवाढीसाठी जी जबाबदारी दिली जाईल ती प्रामाणिकपणे पार पाडू, असा विश्वास रणजित मोरे यांनी व्यक्त केला. तर शिवसेना पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे सांगत सदानंद चव्हाण यांनी नव्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
