देवरुखात ओमेगा गार्डन हॉलचा सोमवारी भव्य शुभारंभ

देवरुख हे संगमेश्वर तालुक्यातील खेडेवजा शहर. तालुक्याचे नाव संगमेश्वर असले, तरी प्रत्यक्षात तहसील कार्यालय, न्यायालय, पंचायत समिती यांसारखी अनेक महत्त्वाची कार्यालये देवरुखमध्येच आहेत. शैक्षणिक सुविधांच्या बाबतीतही देवरुख हे संगमेश्वरपेक्षा पुढे आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत देवरुख शहर झपाट्याने विकसित होत गेले. लोकसंख्या, व्यवहार आणि सामाजिक कार्यक्रमांची संख्या वाढल्याने या भागात उत्तम हॉल आणि दर्जेदार केटरिंग सेवांची गरज निर्माण झाली. एकेकाळी पंतजोशी यांचा हॉल ही देवरुखची खास ओळख होती. अनेकांची लग्ने, समारंभ, राजकीय सभा आणि सामाजिक कार्यक्रम या हॉलमध्ये पार पडले. पंतजोशी यांच्या निधनानंतर हा हॉल बंद पडला, मात्र आजही अनेकांच्या आठवणी त्या हॉलशी जोडलेल्या आहेत. रवींद्र माने, सुभाष बने यांच्यासह अनेक दिग्गजांच्या राजकीय सभा येथे रंगल्या होत्या. आज काळ बदलला आहे. देवरुखची वाढती गरज ओळखून आता शहराच्या मध्यवर्ती आणि सोयीस्कर ठिकाणी ओमेगा गार्डन हॉल उभा राहत आहे. या हॉलचे उद्घाटन सोमवार, दिनांक 4 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता होत असून, माजी मंत्री आमदार भास्करशेठ जाधव, आमदार शेखर निकम, नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, तसेच चिपळूणचे नगरसेवक अजय भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या नव्या उपक्रमामागे आहेत तरुण उद्योजक कल्पेश कापडी, ज्यांनी आपल्या अनुभव, मेहनत आणि सेवाभावाच्या जोरावर देवरुखकरांसाठी नवे पाऊल टाकले आहे.

कुटुंबाचा संघर्ष ते यशाचा प्रवास:
चिपळूण शहर हे कोकणातील मध्यवर्ती ठिकाण आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. चिपळूण म्हटले की, केटरिंग आणि हॉटेल व्यवसायात सहज समोर येणारे नाव म्हणजे कापडी कुटुंब.
एसटी कॅन्टीन, ओमेगा हॉटेल्स, राधाताई लाड हॉल, बांदल हायस्कूल हॉल, रमाबाई गोखले हॉल, अशा अनेक ठिकाणी कापडी कुटुंबाने आपल्या नियोजनबद्ध कामाने आणि चविष्ट भोजनाने लोकांची मने जिंकली.
स्व. किशोर कापडी हे 1982मध्ये चिपळूण अर्बन बँकेचे चेअरमन होते.  त्यांनी नगर पालिकेची निवडणूक जिंकली होती. मधुकर, किशोर आणि मंगेश हे तिघे सख्खे भाऊ. सुरुवातीची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती.
किशोर कापडी यांनी राजापूर येथील एसटी कॅन्टीन चालवण्यास घेतले आणि त्यातून कुटुंबाची परिस्थिती सुधारू लागली. पुढे 1977मध्ये चिपळूण बाजारपेठेतील भाजी मंडईसमोरील कॅन्टीन त्यांनी सुरू केले. आजही ते कॅन्टीन कापडी कुटुंबीय यशस्वीपणे चालवत आहेत.

वडिलांचे निधन आणि कुटुंबांचा भार:
सन 2000च्या सुमारास किशोर कापडी यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे सुपुत्र कल्पेश कापडी हे अकरावीत शिक्षण घेत होते, तर भाऊ बिपिन बारावीत होता. अशा कठीण प्रसंगी कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. 
2005 हे वर्ष कल्पेश कापडी यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरले. याच काळात ते केटरिंग व्यवसायाशी जोडले गेले आणि माजी उपनगराध्यक्ष मिलिंद कापडी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. मिलिंद अण्णांमुळे या व्यवसायातील बारकावे, नियोजन, ग्राहकांची मानसिकता आणि संकटात निर्णय घेण्याची कला त्यांनी आत्मसात केली.
2001 ते 2006 या कालावधीत नगरसेवक राहिलेले मिलिंद कापडी यांनी वैश्य भवन हॉल म्हणजेच राधाताई लाड हॉल चालवायला घेतला आणि कल्पेश कापडी यांना सोबत घेतले. सलग 17 वर्षे कोणतेही वाद, तंटे न होता हा हॉल त्यांनी यशस्वीपणे चालवला आणि नावारूपाला आणला. पुढे कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर तत्कालीन मंत्री भास्कर जाधव यांनी तत्काळ बांदल हायस्कूलचा हॉल चालवण्याची संधी उपलब्ध करून दिली. यानंतर बांदल हायस्कूल हॉल, रमाबाई गोखले हॉल, माऊली हॉल हे सर्व व्यवसाय मिलिंद कापडी, कल्पेश कापडी आणि साजन कापडी यांनी यशस्वीपणे सांभाळले.

देवरुखमध्ये माटे भोजन हॉल ते ओमेगा गार्डन:
केटरिंग क्षेत्रात काम करत असताना कल्पेश कापडी यांना चिपळूणचे विद्यमान नगरसेवक अजयशेठ भालेकर यांच्यासोबत गवळी समाजाच्या माटे-भोजन हॉलचे व्यवस्थापन करण्याची संधी मिळाली. या अनुभवातून त्यांना मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम हाताळण्याचे कौशल्य मिळाले.
2021मध्ये त्यांनी देवरुखमधील माटे-भोजन हॉल चालवायला घेतला. येथे केटरिंग व्यवस्थापन करताना त्यांनी अन्य हॉलच्या तुलनेत वेगळ्या चवीचे पदार्थ आणि उत्कृष्ट सेवा देत अल्पावधीतच हा हॉल लोकप्रिय केला. गेली चार वर्षे देवरुखमध्ये आपल्या गोड स्वभावाने आणि सेवाभावाने त्यांनी असंख्य माणसे जोडली. करार संपल्यानंतर अनेकांनी आग्रह धरला की, ‌‘आता स्वतःचा हॉल उभा करावा.‌’ याचवेळी अजयशेठ भालेकर आणि कल्पेश कापडी यांचे भावोजी समीर गांगण या दोघांच्या सल्ल्याने स्वतःचा हॉल उभारण्याची प्रेरणा मिळाली आणि कामाला सुरुवात झाली. तसेच देवरुखातील बंड्याशेठ  जाधव यांनी जागा उपलब्ध करून दिली आणि आज देवरुख शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक परिसरात ओमेगा गार्डन हॉल साकार झाला आहे. 

व्यवसायातील गुरु आणि संकटातली शिदोरी:
कल्पेश कापडी यांना या व्यवसायात यश मिळवून देण्यात संपूर्ण कापडी कुटुंबाचा मोठा वाटा आहे. ते मिलिंदशेठ कापडी यांना या व्यवसायातील आपले गुरु मानतात. एकदा माटे-भोजने हॉलमध्ये एक हजार लोकांची अपेक्षा असताना अचानक 250 लोक अधिक आले. मात्र कसलीही अडचण न येता, कुणालाही जेवण कमी न पडता कार्यक्रम यशस्वी झाला. अशा प्रसंगी काय करायचे, माणसे नजरेतून कशी मोजायची, अंदाज कसा बांधायचा, हे सर्व धडे त्यांना त्यांच्या गुरुंकडून मिळाले. 

कुटुंबाचा भक्कम पाठिंबा:
कल्पेश कापडी यांचे भावोजी समीर गांगण यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. कोणताही नवा व्यवसाय सुरू करताना ते त्यांच्याशी सल्लामसलत करतात. त्याचप्रमाणे भाऊ आबा, आण्णा, बापू, बिपीन, हेमंत, पुतणे प्रथमेश, मिनेश, साजन, ओंकार, शुभम, प्रियेश यांचे योगदानही त्यांच्या प्रगतीत महत्त्वाचे आहे. पत्नी अनघाची यांची साथ लाभली. 2013ला कल्पेश यांच्या आयुष्यात त्या आल्या आणि भाग्य बदलल.े उच्चशिक्षित असून तुम्ही हे करू शकता, हा आत्मविश्वास तिच्याच मुळे मिळाला.

ओमेगा गार्डन हॉलची वैशिष्ट्ये:
देवरुखमध्ये उभा राहत असलेला ओमेगा गार्डन हॉल हा अत्यंत प्रशस्त, आधुनिक आणि मध्यवर्ती ठिकाणी आहे.
* शहरापासून थोडासा बाजूला, पण सहज पोहोचण्याजोग्या ठिकाणी
 * संगमेश्वर, साखरपा, रत्नागिरी, मार्लेश्वर परिसरासाठी मध्यवर्ती ठिकाण
* 700 लोकांची क्षमता
* प्रशस्त जेवण विभाग
* बुफे पद्धतीची सुविधा
* एसी हॉल करण्याची भविष्यातील तरतूद
* प्रशस्त पार्किंग व्यवस्था
* शहराच्या तुलनेत वाजवी भाडे

लोकांना चांगली सुविधा, दर्जेदार सेवा आणि देवरुखपासून रत्नागिरी, संगमेश्वर ते मार्लेश्वरपर्यंतच्या लोकांची गरज भागवणे हाच या उपक्रमामागील हेतू आहे. ओमेगा गार्डन हॉल हा केवळ एक व्यावसायिक उपक्रम नाही, तर देवरुखच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासातील एक नवे पर्व आहे. येत्या काळात या हॉलमुळे अनेक समारंभ, कार्यक्रम, विवाह सोहळे आणि सांस्कृतिक उपक्रमांना आधुनिक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. कल्पेश कापडी यांना या व्यवसायात अधिक यश मिळो, त्यांच्या हातून देवरुखवासियांची उत्तम सेवा घडो आणि देवरुखकरांनी आजवर दिलेले प्रेम यापुढेही कायम राहो, हीच सदिच्छा.
-योगेश बांडागळे
चिपळूण

 

संबंधित लेख