लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये देणार – एकनाथ शिंदे

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. “लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय मी थांबणार नाही. लवकरच दरमहा 2100 रुपये दिले जातील,” असे आश्वासन त्यांनी दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

महिलांचा पाठिंबा ज्याच्या मागे असतो, त्याचाच विजय होतो, असे सांगत “दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आज तुमच्याकडे विनंती करायला आला आहे,” अशा शब्दांत शिंदे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

यावेळी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. “दुःखाच्या काळातही प्रचार करावा लागतो. निवडणुका लढवय्या कार्यकर्त्यांच्या असतात, त्या पुढे ढकलता येत नाहीत. आम्ही साधेपणाने प्रचार करतो आणि कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घेतो,” असे शिंदे म्हणाले.

कोल्हापूरच्या मातीचे कौतुक करताना त्यांनी शिवसेना उमेदवार संजय मंडलिक यांना पाठिंबा दर्शवला. “संजय मंडलिक एकटे नाहीत, ही जनता त्यांच्या सोबत आहे. ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी असून, जनशक्तीच जिंकते,” असे ते म्हणाले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पक्षाचा पाया मजबूत करणाऱ्या असल्याचे सांगत, “कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी प्रचाराला आलो आहे,” असेही शिंदे यांनी नमूद केले.

संबंधित लेख