शालेय स्पर्धांतून राष्ट्रीय खेळाडू घडावेत: आ. शेखर निकम
- by Yogesh Bandagale
- January 01, 2026
- 44 views
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्था अंतर्गत आयोजित सह्याद्री क्रीडासंग्राम (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक गट) स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण–संगमेश्वरचे आमदार शेखरजी निकम यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून व ध्वजारोहण करून स्पर्धेचा विधिवत शुभारंभ करण्यात आला.
उद्घाटन समारंभास सह्याद्री शिक्षण संस्थेचे विश्वस्त मारुतीराव घाग, शांताराम खानविलकर, सचिव महेश महाडिक, क्रीडा प्रबोधिनीचे प्रमुख अनिरुद्ध निकम, सावर्डे गावचे प्रतिष्ठित नागरिक विजय भुवड, संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक तसेच तब्बल १२६५ खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी सावर्डे, टाळसुरे व असुर्डे विद्यालयातील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे परिभ्रमण करण्यात आले. यामुळे संपूर्ण परिसरात प्रेरणादायी व क्रीडामय वातावरण निर्माण झाले.
मार्गदर्शन करताना आ. शेखरजी निकम म्हणाले,
“सह्याद्री शिक्षण संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या दर्जेदार क्रीडा सुविधांचा खेळाडूंनी योग्य वापर करून कठोर सराव करावा. ग्रामीण भागातील विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर चमकावेत, हे सह्याद्री शिक्षण संस्थेचे स्वप्न आहे. खेळाडूंच्या सर्वांगीण क्रीडा प्रगतीसाठी संस्था नेहमीच खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील.”
शालेय क्रीडा स्पर्धांमधून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू सातत्याने घडावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या क्रीडासंग्राममध्ये संस्थेअंतर्गत ६ प्राथमिक शाळा, २२ माध्यमिक विद्यालये व ५ उच्च माध्यमिक विद्यालयांचा सहभाग असून, संस्थेचे क्रीडा विभाग प्रमुख उदयराज कळंबे यांनी केलेल्या नियोजनानुसार या स्पर्धा तीन दिवस चालणार आहेत. या स्पर्धांमध्ये विविध शाखांमधून राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळलेले खेळाडूही सहभागी होणार आहेत.
सह्याद्री क्रीडासंग्रामाच्या दमदार उद्घाटनाने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, खेळाडूंच्या जोशपूर्ण सहभागामुळे स्पर्धेला भव्य सुरुवात झाली आहे.
