सती चिंचघरी प्राथमिक विद्यालयात ‘दिपोत्सव’ विविध उपक्रमांनी उत्साहात
- by Yogesh Bandagale
- October 18, 2025
- 83 views
खेर्डी-चिंचघरी (ता. चिपळूण) : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळा, चिंचघरी (सती) येथे दिवाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर ‘दिपोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिव्यांची रोषणाई, रंगीबेरंगी रांगोळी, पणत्यांची पंगत आणि पारंपरिक फराळाचा सुगंध या सर्वांनी शाळा आनंदाने उजळून निघाली.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या विविध स्पर्धा.
-
इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक भेटकार्डे,
-
इयत्ता २ रीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर आकाशकंदिल,
-
इयत्ता ३ रीच्या विद्यार्थ्यांनी कलात्मक किल्ले,
-
तर इयत्ता ४ थीच्या विद्यार्थ्यांनी सुगंधी उटणे व आकर्षक पणत्या तयार केल्या.
या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि परंपरांप्रती जिव्हाळा दोन्ही वाढल्याचे दिसून आले.
शाळेच्या शिक्षिका सौ. शितल पाटील यांनी विद्यार्थ्यांना ‘दिवाळी सणाचे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व’ समजावून सांगितले. त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक अरविंद अनंत सकपाळ सर यांनी “फटाके वाजवू नका — प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा” असा संदेश देत विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचे आवाहन केले.
या वेळी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याबाबतचा संदेश असलेले भेटकार्ड आणि उटणे पॅकेट देण्यात आले.
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाअंतर्गत शिक्षिका विनया नटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देणारा एक आकर्षक मोठा आकाशकंदिल तयार करून शाळेच्या दर्शनी भागात लावला.
या उपक्रमाचे आयोजन शिक्षिका वृषाली राणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरविंद सकपाळ (मुख्याध्यापक), मनीषा कांबळी, रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत, अपूर्वा शिंदे, विनया नटे, वृषाली राणे, अर्चना देशमुख, ज्योती चाळके, रूपाली खरात, वर्षा सकपाळ, शितल पाटील, स्वरा भुरण, विजया मौजे, समीर इंगवले, तसेच शिक्षकेतर कर्मचारी विनोद उदेग आणि एकनाथ चाळके यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ सणाचा आनंदच नाही, तर स्वतःच्या परंपरा, संस्कृती आणि पर्यावरणाचे भान यांचीही जाणीव झाली.
