सावर्डे विद्यालयात वर्ग सजावट स्पर्धा
- by Yogesh Bandagale
- December 23, 2025
- 50 views
सावर्डे | प्रतिनिधी
सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने वर्ग सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षक व विषय शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या इयत्तेनुसार व विषयानुसार विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य स्वतः तयार करून ते वर्गात आकर्षकरीत्या मांडले. वर्गातील भिंतींवर शैक्षणिक चार्ट, चित्रे, संकल्पनात्मक फलक लावण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी सुवचने लिहून वर्गातील वातावरण अधिक सकारात्मक व उत्साही बनवले.
प्रत्येक वर्गात इयत्ता व तुकडी दर्शवणारे फलक, शिक्षकांचे फोटो, वेळापत्रक तसेच आवश्यक सूचना फलक लावण्यात आले. वर्ग स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला. त्यासाठी वर्ग स्वच्छ ठेवणे, डस्टबिनची व्यवस्था करणे यासह स्वच्छ, नीटनेटके आणि शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा सुंदर आविष्कार करत वर्ग सजावट केली.
या संपूर्ण उपक्रमात शासकीय नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. वर्ग अध्यापन व अध्ययन सुलभ होऊन सुंदर, प्रेरणादायी आणि शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय, संघभावना, सृजनशीलता तसेच जबाबदारीची जाणीव निर्माण झाल्याचे दिसून आले.
स्पर्धेच्या परीक्षणासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्रकुमार वारे यांनी सर्व वर्गांची पाहणी केली. परीक्षणानंतर निकाल जाहीर करण्यात आला.
इयत्ता नववी ‘ब’ वर्गाने प्रथम क्रमांक, इयत्ता सहावी ‘ब’ वर्गाने द्वितीय क्रमांक, तर इयत्ता सातवी ‘ब’ वर्गाने तृतीय क्रमांक पटकावला.
पारितोषिक वितरण कार्यक्रमात विजेत्या वर्गांच्या प्रतिनिधींना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या वेळी विद्यालयाचे उपप्राचार्य विजय चव्हाण, सर्व वर्गशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही वर्ग सजावट स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देणारी, शैक्षणिक वातावरण समृद्ध करणारी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पूरक ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
