शिरगावमध्ये उबाठाला जोरदार धक्का
- by Yogesh Bandagale
- January 31, 2026
- 188 views
शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश
चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शिरगावमध्ये उबाठा शिवसेनेला जोरदार धक्का बसला असून, मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेना उपनेते व माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. सदानंद चव्हाण यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विनोद झगडे, अनंत पवार, वैभव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना, सदानंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी विविध राजकीय पक्षांत गेलेल्या शिवसैनिकांनी पुन्हा शिवसेनेत परत यावे, असे आवाहन सदानंद चव्हाण यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत असून, विरोधी पक्षांमधून—विशेषतः उबाठा शिवसेनेतून—कार्यकर्त्यांचे शिवसेनेत प्रवेश वाढत आहेत.
माजी आरोग्य व बांधकाम सभापती विनोद झगडे आणि विभागप्रमुख वैभव पवार यांच्या प्रयत्नांतून शिरगाव परिसरातील मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये शिरगाव ग्रामपंचायत सदस्य उमेश रामदास चिपळूणकर यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश होता.
या प्रवेशप्रसंगी सदानंद चव्हाण यांनी नवप्रवेशित कार्यकर्त्यांना भगवा झेंडा देत पक्षात स्वागत केले. “पक्षात तुमचा योग्य तो सन्मान राखला जाईल. आज केलेल्या पक्षप्रवेशाचा तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही,” असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.
यावेळी बोलताना नवप्रवेशित कार्यकर्त्यांनी सांगितले की, “तालुक्यात सदानंद चव्हाण यांच्यासारखे सर्वांना सोबत घेऊन जाणारे व कार्यकर्त्यांची कदर करणारे दुसरे नेतृत्व नाही. पूर्ण विचार करूनच आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे.”
या पक्षप्रवेशामुळे शिरगाव जिल्हा परिषद गटात शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
या वेळी गणेश शिंदे, राजाभाऊ ताम्हणकर, इर्शाद मुल्लाजी, अवधूत शिर्के, प्रशांत शिंदे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
