सावर्डे खोतवाडीतील ज्येष्ठ समाजसेवक ह.भ.प. मारुतीराव चव्हाण यांचे निधन
- by Yogesh Bandagale
- October 20, 2025
- 49 views
सावर्डे : सावर्डे (खोतवाडी) येथील प्रतिष्ठित ग्रामस्थ, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ ह.भ.प. श्री. मारुतीराव शिवराम चव्हाण (वय ९६) यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने गावातील एक जाणकार, सर्वसमावेशक आणि समाजहितासाठी कार्यरत असलेले व्यक्तिमत्त्व हरपले आहे.
ह.भ.प. मारुतीराव चव्हाण यांनी आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलात कॅप्टन म्हणून जबाबदारी पार पाडली. सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी मूळ गाव सावर्डे येथे स्थायिक होऊन वारकरी संप्रदाय, हरिनाम सप्ताह, भजन-कीर्तन आणि जनसेवा या माध्यमातून आपले आयुष्य समर्पित केले.
ते सावर्डे येथील केदारनाथ देवस्थानचे जाणकार आणि परंपरागत माहितीचे दांडगे अभ्यासक होते. सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्र घेऊन चालणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. समाजात सलोखा आणि एकोपा टिकवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.
सामाजिक क्षेत्रासोबतच त्यांनी सावर्डे ग्रामपंचायतीचे उपसरपंच पदही भूषविले होते. गावातील विकासकामे, रस्ते, पाणीपुरवठा आणि देवस्थान व्यवस्था या विषयांत त्यांचा सक्रिय सहभाग होता.
त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचा अंत्यविधी मंगळवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता सावर्डे (खोतवाडी) येथे पार पडणार आहे.
गावात त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत असून, “गावातील एक दिशादर्शक नेतृत्व हरपले” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.
