कुंभार्ली घाटातील सोनपात्रा परिसरात टँकर उलटला
- by Yogesh Bandagale
- January 02, 2026
- 428 views
अवजड वाहतूक ठप्प; रस्ता ठरतोय अपघातांचा ‘ब्लॅक स्पॉट’
चिपळूण : चिपळूण–कराड राष्ट्रीय महामार्गावरील कुंभार्ली घाटातील रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली असून सोनपात्रा परिसरातील तीव्र वळण मृत्यूचा सापळा ठरत आहे. चढ-उताराच्या या अवघड वळणावर मोठमोठे खड्डे पडल्याने दररोज मालवाहू ट्रक, कंटेनर व टँकर पलटी होण्याच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी सकाळी याच ठिकाणी एक टँकर उलटल्याने कुंभार्ली घाटातील अवजड वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला कुंभार्ली घाट मार्ग सध्या अपघातप्रवण ठिकाण म्हणून ओळखला जाऊ लागला असून सोनपात्रा येथील चढ-उताराच्या तीव्र वळणावरच रस्त्यावर खोल खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहने अडकून पलटी होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
शुक्रवारी सकाळी टँकर पलटी झाल्यानंतर या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अरुंद रस्ता व जागेअभावी अवजड वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वारंवार अपघात घडूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांचा जीव कायम धोक्यात आहे.
दरम्यान, कुंभार्ली घाटातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) चे तालुकाध्यक्ष नितीन उर्फ अबू ठसाळे तसेच काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भरत लब्धे यांनी या मार्गावर तातडीने दुरुस्ती व सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यापूर्वी दिला होता.
