संजीव करपे यांना ‘शिक्षणमहर्षी गोविंदराव निकम सह्याद्री पुरस्कार–2026’ प्रदान
- by Yogesh Bandagale
- January 16, 2026
- 115 views
सावर्डे (रत्नागिरी) : ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत उपजीविकेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संजीव करपे यांना सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे यांच्या वतीने स्वर्गीय शिक्षणमहर्षी गोविंदरावजी निकम यांच्या जयंतीनिमित्त “शिक्षणमहर्षी गोविंदराव निकम सह्याद्री पुरस्कार–2026” देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारताना संजीव करपे यांनी आत्मनिर्भर कोकणासाठी व्यवसायदृष्टिकोनाची गरज अधोरेखित केली. स्थानिक संसाधनांवर आधारित उद्योग उभारणी केल्यास निसर्गाचे संवर्धन करत टिकाऊ विकास साधता येईल, असे त्यांनी नमूद केले. कोकणातील युवकांमध्ये मोठी बुद्धिमत्ता असून तिला योग्य कौशल्याची जोड दिल्यास शाश्वत विकास शक्य आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संजीव करपे हे कोकण बांबू अँड केन डेव्हलपमेंट सेंटर (KONBAC), कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) चे मार्गदर्शक संचालक असून गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी बांबू लागवड, प्रक्रिया, डिझाइन, उत्पादन, उद्यम विकास व विपणनाचे एकात्मिक मॉडेल यशस्वीपणे उभारले आहे. KONBAC च्या माध्यमातून हजारो ग्रामीण कारागीर, महिला व युवकांना कौशल्याधारित रोजगार आणि आत्मनिर्भरतेच्या संधी मिळाल्या आहेत. 1998 साली स्थापन झालेल्या KONBAC च्या कार्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांबू उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळून त्यांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीस मोठा हातभार लागला आहे.
तसेच JANS Bamboo Products Pvt. Ltd. आणि Woodygrass या उपक्रमांद्वारे भारतीय बांबू उद्योगाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळाली आहे. भारतासह मालदीव व इतर देशांतील इको-रिसॉर्ट्स, बांबू संरचना व पर्यावरणपूरक बांधकामांमुळे शाश्वत पर्यटन आणि हरित अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे.
कार्यक्रमात त्यांच्या कार्याची माहिती चित्रफितीद्वारे सादर करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते यजुर्वेंद्र महाजन, अभिनेत्री गार्गी फुले थत्ते, उद्योजक प्रदीप निकम, शिरीष निकम, संस्थेचे विश्वस्त शांताराम खानविलकर, मारुतीराव घाग, मानसिंग महाडिक, चंद्रकांत सुर्वे, आकांक्षा पवार, मनोहर महाडिक, सचिव महेश महाडिक, उद्योजक प्रशांत निकम, चित्रकार जीवनगौरव पुरस्कार विजेते प्रकाश राजेशिर्के, अंजली चोरगे, युगंधरा राजेशिर्के, पूजाताई निकम, रावसाहेब सुर्वे, बंधू पाकळे, सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम, नगरसेवक निहार कोवळे यांच्यासह कला, क्रीडा, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, सावर्डे ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी संजीव करपे यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व २५ हजार रुपये रोख स्वरूपात प्रदान करण्यात आले. त्यांच्या कार्यामुळे समाज, पर्यावरण आणि राष्ट्राच्या शाश्वत भविष्यास नवी दिशा मिळत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
