विकास निर्देशांकात रत्नागिरी जिल्हा प्रथम
- by Yogesh Bandagale
- March 17, 2026
- 112 views
रत्नागिरी, दि. 17 (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्याने विकासाच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हा विकास निर्देशांकात प्रथम क्रमांक पटकावला आहे. दै. लोकसत्ताच्या जिल्हा निर्देशांक उपक्रमांतर्गत करण्यात आलेल्या विश्लेषणातून हा निष्कर्ष समोर आला आहे.
पुणे येथील गोखले अर्थशास्त्र संस्था यांच्या माध्यमातून सांख्यिकी विभागाच्या तपशीलाच्या आधारे राज्यातील विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले. त्यात रत्नागिरी जिल्ह्याने सर्वांगीण विकास निर्देशांकात आघाडी घेत प्रथम क्रमांक मिळवला.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा सन्मान शुक्रवार, 20 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता ताज विवांता कफ परेड, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात येईल.
या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान सोहळा पार पडणार असून, भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव डॉ. सौरभ गर्ग हे देखील प्रमुख उपस्थिती दर्शवणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याच्या या यशामुळे जिल्ह्यातील विकासकामांना चालना मिळाल्याचे मानले जात असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेचेही कौतुक केले जात आहे.
