मुख्याधिकारी संजय प्रकाश जाधव यांनी पदभार स्वीकारला
- by Yogesh Bandagale
- January 22, 2026
- 685 views
चिपळूण | प्रतिनिधी : चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांची पदोन्नतीने बदली झाल्याने त्यांच्या जागी संजय प्रकाश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर गुरुवारी नवे मुख्याधिकारी संजय जाधव यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला.
संजय जाधव हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कसबे सुकेळे येथील आहेत. शालेय जीवनापासूनच त्यांनी आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला असून दहावीच्या परीक्षेत ते तालुक्यात प्रथम आले होते. त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून त्यांनी बी.टेक. पदवी प्राप्त केली.
१९९६ ते १९९८ या कालावधीत त्यांनी अहमदनगर येथे खाजगी नोकरी केली. १९९६मध्ये त्यांची इंडियन मिलिटरी आर्मीमध्ये निवड झाली होती; मात्र कौटुंबिक कारणांमुळे त्यांना सेवेत रुजू होता आले नाही. २००१ मध्ये एमपीएससीमार्फत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी त्यांची निवड झाली असून या परीक्षेत त्यांनी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला होता.
२००४ मध्ये केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) मध्ये सब-इन्स्पेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि दिल्ली येथे त्यांनी एक वर्ष सेवा बजावली. २००६ ते २०१० या कालावधीत नवी मुंबईतील रबाळे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांनी काम केले.
२००९ मध्ये एमपीएससीमार्फत मुख्याधिकारी पदासाठी त्यांची निवड झाली. २०१० ते २०१३ या कालावधीत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी कार्य केले. २०१३ ते २०१६ सिन्नर नगर परिषदेत, २०१६ ते २०१९ चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगर पालिकेत मुख्याधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. २०२० ते २०२३ या कालावधीत त्र्यंबकेश्वर येथील त्रिंबक नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. २०२३ मध्ये त्यांची नाशिक महानगर पालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती.
पोलीस प्रशासन आणि नगर परिषद प्रशासनाचा प्रदीर्घ व दांडगा अनुभव असलेले अधिकारी म्हणून संजय जाधव यांचे चिपळूणला आगमन झाले आहे.
प्रशासकीय सेवेसोबतच क्रीडा क्षेत्रातही त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. फुटबॉल, हॉकी व हँडबॉल या खेळांमध्ये ते राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहेत. तसेच ॲथलेटिक्समध्ये ४०० मीटर धावणे आणि लांब उडी या प्रकारात त्यांनी राज्यस्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. एनसीसीमार्फत रिपब्लिक डे परेडमध्ये महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करण्याचा मानही त्यांना मिळाला आहे.
खेळाडू वृत्तीचे आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख असलेले संजय जाधव यांनी गुरुवारी चिपळूण नगर परिषदेत पदभार स्वीकारला. यावेळी उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, मंगेश पेढामकर, संतोष शिंदे, सुजित जाधव, श्री. डफळ आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
