स्व. गोविंदरावजी निकम जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन
- by Yogesh Bandagale
- December 17, 2025
- 43 views
सावर्डे : रत्नागिरीचे माजी खासदार, सहकार व शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा, सावर्डे (ता. चिपळूण) येथे बुधवार, दि. ७ जानेवारी २०२६ रोजी होणार आहेत.
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या वक्तृत्व स्पर्धेला सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे.
स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे असतील —
१) घरात हवेत आजी–आजोबा
२) सोशल मीडियाचे समाजावर होणारे परिणाम
या स्पर्धेत प्रथम क्रमांकास रोख रुपये ५,०००, द्वितीय क्रमांकास रुपये ३,००० तर तृतीय क्रमांकास रुपये २,०००, चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धा केवळ मराठी भाषेत होणार असून प्रत्येक स्पर्धकास ५+२ मिनिटांचा वेळ देण्यात येईल. एका शाळेतील केवळ दोन विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. प्रवेशिकेस मुख्याध्यापकांची सही आवश्यक असून प्रवास खर्च स्पर्धकांनी स्वतः करावयाचा आहे.
जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा
याच दिवशी सकाळी ११ ते १२ या वेळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेचे विषय —
१) इतिहासातील स्त्री व आजची स्त्री
२) संगणक साक्षरता – काळाची गरज
निबंध स्पर्धेतही प्रथम क्रमांकास रुपये ५,०००, द्वितीय क्रमांकास रुपये ३,००० व तृतीय क्रमांकास रुपये २,०००, चषक व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धकांकडून स्पर्धास्थळीच निबंध लिहून घेतले जातील. निबंध मराठी भाषेत, स्वतःच्या हस्ताक्षरात, २५० ते ३०० शब्दांचा असावा. स्पर्धेस कोणतीही फी आकारली जाणार नाही. एका शाळेतील कितीही विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
बक्षीस वितरण समारंभ
या दोन्ही स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार, दि. १७ जानेवारी २०२६ रोजी स्व. गोविंदरावजी निकम यांच्या जयंती महोत्सव कार्यक्रमात, त्यांच्या स्मारकस्थळी सावर्डे (ता. चिपळूण) येथे होणार आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी
वक्तृत्व स्पर्धा संपर्क : रसिका सुर्वे (८३६९७६२३९७), प्रणित राजेशिर्के (८४११०६६८७२)
निबंध स्पर्धा संपर्क : प्रणिता दिंडे (९०४९११५७६५), अक्षता घाग (९६८९७९२९३०)
या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील वक्तृत्व, लेखन व विचारशक्तीला चालना मिळणार असून जिल्ह्यातील शाळांमधून मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित आहे.
