विद्याभारतीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
- by Yogesh Bandagale
- January 02, 2026
- 51 views
चिपळूण : विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे प्रभावी माध्यम म्हणजे शालेय स्नेहसंमेलन. विद्याभारती भारतीय शिक्षण संकुल, पंचकोशाधारित गुरुकुलचे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ चे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी माऊली लॉन्स अँड गार्डन येथे अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडले.
या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्रांताधिकारी शंकर नारायण पालशेतकर उपस्थित होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुमेध करमरकर, कार्यवाह छायाताई मुसळे, कोषाध्यक्ष स्वाती ढोले, शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत सावर्डेकर, प्रभारी मुख्याध्यापिका जान्हवी टाकळे, गुरुकुल प्रबंधक मोहन भिडे तसेच विद्याभारती रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनाली खर्चे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. चंद्रकांत सावर्डेकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर जान्हवी टाकळे यांनी गुरुकुलचा वार्षिक अहवाल सादर केला. अहवालानंतर सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल कु. मेघन तेजानंद गणपत्ये तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पश्चिम विभागात द्वितीय क्रमांक मिळवून राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केल्याबद्दल कु. अनुराधा बिरबल बिश्नोई या दोन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर प्रमुख पाहुणे पालशेतकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.
सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात संस्कृत ईशस्तवनाने झाली. गुरुकुलमध्ये इयत्ता पहिलीपासून संस्कृत भाषेचे शिक्षण दिले जाते, याचे प्रभावी सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारांचे सादरीकरण केले. यावर्षीच्या स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील विविध लोककला व सांस्कृतिक परंपरांचे सादरीकरण. यामध्ये गोंधळ, शेतकरी नृत्य, धनगर नृत्य, टिपरी नृत्य, तबला वादन यांचा समावेश होता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘पंचपरिवर्तन’ या विषयावर आधारित भारुड, मुकनाट्य, नाटिका व गीतांचे सादरीकरण करण्यात आले. अभंग सादरीकरणादरम्यान रंगविण्यात आलेले पांडुरंगाचे चित्र हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. कार्यक्रमाचा कळस ठरला तो दिंडी नृत्याचा देखणा आविष्कार.
बहुतेक कार्यक्रमांमध्ये शिक्षकांनी स्वतः गाणी गायली तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांनी वाद्यांची साथ केली, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली. याशिवाय मुलींनी योगासनांचे मनोरे सादर केले तर कार्यक्रमाच्या शेवटी मल्लखांबाचे थरारक सादरीकरण झाले. सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन व मार्गदर्शन शिक्षकांनीच केले होते.
यावेळी सरस्वती शिशुमंदिर, चिपळूण तसेच शिरळ येथील शिशुवाटिकेतील चिमुकल्यांनी नृत्य व गीत सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुश्रुत चितळे व केतकी मुसळे यांनी केले. स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
