मिऱ्या समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम यशस्वी
- by Yogesh Bandagale
- September 20, 2025
- 51 views
रत्नागिरी: आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिनानिमित्त मिऱ्या बीचवर मोठ्या उत्साहात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शिवाजी हायस्कूल, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन शिरगाव, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र झाडगाव, जलजीविका संस्था पुणे, सागरी सीमा मंच मिऱ्या आणि स्टुडंट्स फॉर डेव्हलपमेंट रत्नागिरी या संस्थांनी संयुक्तपणे या उपक्रमाचे आयोजन केले.
या प्रसंगी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी स्वच्छतेचे महत्त्व विषद करत सर्वांना शपथ दिली. त्यांनी समुद्रकिनाऱ्यावरील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी असे आवाहन केले.
मोहीमेच्या वेळी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व घरगुती टाकाऊ वस्तू गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी सागरी सीमा मंचाचे स्वप्निल सावंत, संजीव लिमये, रंजन आगाशे, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे संशोधन अधिकारी डॉ. आसीफ पागरकर, अभिरक्षक डॉ. हरीश धम्मगये, नरेंद्र चौगुले, वर्षा सदावर्ते, अर्चना सावंत, जाई साळवी, रमेश सावर्डेकर आदी उपस्थित होते.
तसेच मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राध्यापक निलेश मिराजकर, रोहित बुरटे, सुशील कांबळे, मयुरी डोंगरे, शिवाजी हायस्कूलचे 57 विद्यार्थी व शिक्षक तसेच सर्व कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. जलजीविका संस्था पुणेचे चिन्मय दामले व सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना हॅन्ड ग्लोज व पिण्याचे पाणी पुरवले.
या सर्व संस्थांनी संयुक्तपणे मिऱ्या बीच वर्षभर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला आहे. ग्रामस्थ व मिरकरवाडा येथील मच्छीमारांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवून स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
