दापोली-खेड मार्गावर कुंभवे येथे चालती कार पेटली
- by Yogesh Bandagale
- October 21, 2025
- 132 views
दापोली : दापोली-खेड मार्गावर कुंभवे येथे शनिवारी सकाळी एक कार अचानक पेट घेऊन काही क्षणांतच जळून खाक झाली. सुदैवाने कारचालकाने वेळीच बाहेर पडत जीव वाचवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारमधून मालक नफिज मुकादम हे एकटेच प्रवास करत होते. प्रवासादरम्यान अचानक कारमधून धूर निघू लागल्याचे त्यांनी लक्षात घेतले. तत्काळ शंका आल्याने मुकादम यांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि बाहेर पडले. काही क्षणांतच कारला मोठी आग लागली आणि काही मिनिटांतच ती संपूर्णपणे जळून खाक झाली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. दलाने आग नियंत्रणात आणली, मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून गेली होती.
या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु गाडीतील इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दापोली पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
