युवती शहर संघटक डॉ. सानिका टाकळेंचा पदासह पक्षातून राजीनामा
- by Yogesh Bandagale
- December 23, 2025
- 357 views
चिपळूण | प्रतिनिधी
चिपळूण नगरपरिषदेची निवडणूक संपताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला आहे. चिपळूण येथील युवती शहर संघटक डॉ. सानिका टाकळे यांनी आपल्या पदासह पक्षाचाही राजीनामा देत उबाठाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या पक्षाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे.
राजीनामा देताना डॉ. टाकळे यांनी पक्षातील कार्यपद्धतीवर जळजळीत शब्दांत टीका केली आहे. “कार्यकर्त्यांना पुढे ढकलून वाऱ्यावर सोडण्याची, नेत्यांसाठी कार्यकर्त्यांनी मरीमर मरायची ही पद्धत अत्यंत घातक आणि क्लेशदायक आहे. अशी कार्यशैली पक्ष आणि कार्यकर्त्यांचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करणारी आहे,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान उबाठामध्ये उघडपणे दोन गट पडल्याचे चित्र दिसून आले. एक गट आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली आघाडीत सहभागी झाला, तर दुसऱ्या गटाने खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. या गटबाजीचा फटका पक्षाला बसला असून, निवडणुकीत पक्षाची ताकद विभागली गेली. आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली पाच नगरसेवक निवडून आले, तर राऊत गटातील सर्व उमेदवारांचा पराभव झाला. त्यामुळे गटबाजीमुळे उबाठाला मोठे नुकसान सहन करावे लागले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
डॉ. सानिका टाकळे यांनी उबाठाकडून नगरसेवक पदाची निवडणूक लढवली होती; मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. निवडणुकीनंतर लगेचच त्यांनी पक्षाला राजीनामा दिला. टाकळे कुटुंब हे चिपळूणमधील कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाते. “आम्हाला स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास लाभला. त्यांच्या शिकवणीप्रमाणे आम्ही आजवर पक्षाचे प्रामाणिक काम केले. स्वतःच्या उद्योग-व्यवसायाकडे दुर्लक्ष करून पक्षासाठी अहोरात्र झटत राहिलो,” असेही त्यांनी नमूद केले आहे.
पुढे बोलताना डॉ. टाकळे म्हणाल्या, “माझे वडील समीर टाकळे यांनीही आपले संपूर्ण आयुष्य पक्षासाठी वेचले. मात्र त्यांचे राजकीय आयुष्यही अशाच पद्धतीमुळे उद्ध्वस्त झाले. नेहमीच कार्यकर्त्यांवर अन्याय होणार असेल, तर पक्षात राहून काम करण्याला अर्थ उरत नाही. त्यामुळेच मी पद आणि पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.”
निवडणूक संपताच युवती शहर संघटकाने दिलेला हा राजीनामा उबाठासाठी मोठा धक्का मानला जात असून, चिपळूणमधील निष्ठावान टाकळे कुटुंबातून थेट राजीनामा दिला गेल्याने पक्षासाठी ही आत्मचिंतनाची वेळ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
