आमदार शेखर निकम यांचा कोकण विकासासाठी ठोस आग्रह
- by Yogesh Bandagale
- February 25, 2026
- 31 views
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना आमदार शेखर निकम यांनी कोकण प्रदेशाच्या सर्वांगीण आणि संतुलित विकासासाठी शासनाने ठोस व परिणामकारक पावले उचलावीत, अशी आग्रही भूमिका मांडली.
पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासासाठी प्रस्तावित ३,६६१ कोटी रुपयांच्या निधीबाबत त्यांनी शासनाचे अभिनंदन केले. तसेच कसबा येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रस्तावित ३१३ कोटी रुपयांच्या निधीला येत्या अर्थसंकल्पात गती देण्याची मागणी त्यांनी केली. स्मारकामुळे तरुण पिढीला इतिहासाची प्रेरणा मिळेल आणि पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
कोकणातील आंबा व काजू पिकांवर हवामान बदलाचा गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यंदा मोहर गळाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने त्यांच्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच आफ्रिकन काजू आयातीमुळे स्थानिक उत्पादकांवर अन्याय होत असल्याने आयात शुल्क वाढविण्याचा विचार करावा, असेही सुचवले.
बांबू शेतीला कृषी पिकाचा दर्जा देऊन कोकणात ‘बांबू हब’ उभारण्याची संकल्पना त्यांनी मांडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे संजिव करपे यांनी बांबू प्रक्रियेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प उभारले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. बांबू प्रक्रियेमुळे रोजगारनिर्मिती आणि उत्पन्नवाढ होण्याची शक्यता अधिक आहे, असे त्यांनी नमूद केले.
पूरनियंत्रणाच्या उपाययोजनांबाबत बोलताना चिपळूणसारख्या भागात वारंवार पूरस्थिती निर्माण होत असल्याने स्थानिक प्रतिनिधींना नियोजन समित्यांमध्ये स्थान देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच पानंद रस्त्यांच्या निकषांमध्ये शिथिलता आणून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा सक्षम करण्याची गरज अधोरेखित केली.
आमदार शेखर निकम यांनी ठळकपणे सांगितले की, कोकण हा केवळ निसर्गसंपन्न प्रदेश नाही तर महाराष्ट्राच्या विकासाचे इंजिन बनू शकतो. पर्यटन, शेती, फूड प्रोसेसिंग, बांबू उद्योग आणि पायाभूत सुविधा या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून कोकणाचा संतुलित विकास साधावा, असे त्यांनी आवाहन केले.
