चिपळूणमध्ये बुधवारी ‘रायगडला जेव्हा जाग येते’ नाटक
- by Yogesh Bandagale
- February 16, 2026
- 171 views
चिपळूण : सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे बुधवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ‘रायगडला जेव्हा जाग येते’ हे ऐतिहासिक नाटक सादर होणार आहे.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर १८ फेब्रुवारी रोजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार असून, १९ फेब्रुवारी रोजी महाराजांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या शौर्यगाथा, स्वराज्यस्थापनेचा इतिहास आणि आदर्श नेतृत्व यावर आधारित विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे संचालनालयाने आपल्या पत्रात नमूद केले आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्थानिक कलावंत आणि तंत्रज्ञांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा असून, शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन नव्या पिढीपर्यंत स्वराज्याचा इतिहास पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
शिवप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
