कबड्डीचा तेजोमय योद्धा : कोकणाचा अभिमान निलेश शिंदे
- by Yogesh Bandagale
- October 08, 2025
- 82 views
चिपळूण : मातीचा गंध, घामाचा सुगंध आणि परिश्रमाच्या थेंबातून झळकलेले सुवर्णयश… ही कहाणी आहे एका असामान्य खेळाडूची, कोकणच्या सुपूत्राची, ज्याने कबड्डीच्या मैदानावर आपल्या नावाचं अधिराज्य गाजवलं. हा खेळाडू म्हणजेच महाराष्ट्राचा अभिमान – निलेश शिंदे.
चिपळूण तालुक्यातील निसर्गरम्य शिरगाव हे त्यांचे मूळ गाव. दसपटी येथील राम वरदायिनी यात्रा दरवर्षी भरते, जिथे देशभरातील दिग्गज खेळाडू मानाच्या स्पर्धेत खेळण्यासाठी येतात. या यात्रेला दसपटी मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखले जाते. दसपटकरांची कुलस्वामिनी आई रामवरदायिनी मातेच्या आशीर्वादाने निलेश शिंदेचा आयुष्याचा प्रवास तेजोमय झाला आहे. आजही निलेश शिंदे या यात्रेत हजेरी लावतात आणि गावकऱ्यांसमोर खेळताना त्यांच्या प्रत्येक चालीत मातीतल्या प्रेमाचा आणि परंपरेचा झरा झुळझुळतो. त्यांच्या खेळात गावाचा अभिमान आणि भक्तीची ऊर्जा एकवटलेली दिसते.
वयाच्या केवळ बाराव्या वर्षी कबड्डीशी नातं जोडणारा निलेश शिंदे मुंबई उपनगर संघातून स्पर्धा खेळत आपल्या कौशल्याची ख्याती निर्माण करतो. शाळा व महाविद्यालयीन स्तरावर जिल्हा व राज्य प्रतिनिधित्व करताना त्याने आपल्या संघाला विजयाची सवय लावली. मुंबई विद्यापीठाच्या कबड्डी संघाचे दोन वेळा कर्णधारपद भूषवून, चौदा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्वतःच्या नेतृत्वाखाली कांस्यपदक पटकावणारा हा खेळाडू चिकाटी, शिस्त आणि नेतृत्व यांचा आदर्श ठरला आहे.
महाराष्ट्र राज्य संघातून ८ वेळा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होत, २००७ साली तब्बल अठ्ठावीस वर्षांनी महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या संघात निलेश अग्रभागी होता. याचबरोबर ३ वेळा रौप्यपदक मिळवून महाराष्ट्राच्या गौरवकथेत त्याचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले.
या तेजस्वी प्रवासाची शिखरे गाठताना, २०१० साली दुसऱ्या आशियाई बीच गेम्समध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकून निलेश शिंदेने देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवला. २०११ साली त्यांना “मधू पाटील पुरस्कार” वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून मिळाला. २०१४ ते २०१६ या काळात त्यांनी प्रो कबड्डीमध्ये “बेंगॉल वॉरियर्स” संघाचे कर्णधारपद भूषवले आणि महाराष्ट्राचा झेंडा व्यासपीठावर उंचावला.
सध्या ते भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मध्ये खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत, जिथे ते नव्या पिढीला प्रेरणादायी मार्गदर्शन देतात. २०१९ आणि २०२० मध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रशिक्षक प्रताप शेट्टी, तसेच मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह व BPCL व्यावसायिक संघाचे व्यवस्थापक सुधाकर घाग हे त्यांचे प्रेरणास्त्रोत ठरले.
१५ जुलै रोजी कबड्डी दिनाच्या निमित्ताने, स्वस्तिक क्रीडा मंडळाला २०२३/२४ या वर्षात सर्वाधिक राज्यस्तरीय स्पर्धा जिंकल्याबद्दल ‘अमृत कलश’ पुरस्कार निलेश शिंदे यांनी पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर स्वीकारला. हा गौरव त्यांच्या मेहनतीचा आणि समर्पणाचा साक्षात्कार ठरला.
निलेश शिंदे हे नाव म्हणजे जिद्द, शिस्त आणि समर्पण यांचे त्रिवेणी संगम.
त्यांच्या खेळात फक्त कौशल्य नाही, तर प्रत्येक चालीत ‘विजयाची ओढ’, प्रत्येक पकडीत ‘पराक्रमाचा स्पर्श’ आणि प्रत्येक यशामागे ‘मातीतल्या संस्कारांची छाया’ आहे.
मातीचा सुगंध घेऊन रणांगणावर उभा राहणारा, कोकणाचा तेजवीर आणि महाराष्ट्राचा अभिमान – निलेश शिंदे!
त्याच्या खेळात जिद्द आहे, त्याच्या नजरेत आग आहे, आणि प्रत्येक विजयात एक स्फूर्तीचा इतिहास आहे.
“कर्तृत्वाची ओळख पदकात नाही, ती लोकांच्या अभिमानात असते!”
?? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, निलेशजी शिंदे! ??
आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण नवा उत्साह आणि नवं यश घेऊन येवो, प्रेरणेचा झेंडा उंच फडकत राहो, आणि महाराष्ट्राच्या अभिमानाचा दीप सदैव तेजोमय राहो!
—
अमोल शशिकांत टाकळे
उत्कृष्ट निवेदक पुरस्कार विजेता
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन
मो. 9423296920
