शिवसेनेच्या घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
- by Yogesh Bandagale
- October 03, 2025
- 352 views
साहिल ठाकरे प्रथम, वंदेश चव्हाण द्वितीय,
तर वैभव चव्हाण, यश किंंजळकर तृतीय
चिपळूण : शहर शिवसेना चिपळूण यांच्यावतीने आयोजित घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२५ला गणेशभक्तांचा भरघोस प्रतिसाद लाभला. भक्तिभाव, सृजनशीलता आणि नयनरम्य सजावटीने सजवलेल्या गणेशमूर्तींची विविध घरे खुलून दिसत होती. स्पर्धेतील सहभागाने शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून, प्रथम क्रमांक साहिल केरू ठाकरे (पाग, गोपाळकृष्णवाडी) यांनी पटकावला आहे.
द्वितीय क्रमांक वंदेश किरण चव्हाण (पेठमाप, चिपळूण) यांना मिळाला. तृतीय क्रमांक विभागून वैभव विलास चव्हाण (खेंड, बडदेवाडी) आणि यश शशिकांत किंंजळकर (शिवाजीनगर, एसटी स्टँडसमोर, ओझरवाडी) यांना प्राप्त झाला. उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी प्रणव संदीप खेडेकर (मिरगलवाडी, पाग), ऐश्वर्या गोरिवले (ऊक्ताड, गणेश मंदिराजवळ), युवराज रवींद्र चव्हाण (स्वामी छाया, जुने पोलीस स्टेशन पाग), निलेश संतोष चव्हाण (खेंड, कांगणेवाडी) आणि साहिल संदीप उदेग (धामणवणे, खोतवाडी) यांची निवड करण्यात आली.
प्रथम क्रमांकला रोख रक्कम ५ हजार, द्वितीय क्रमांकला ३ हजार, तृतीय क्रमांकला २ हजार, तर उत्तेजनार्थ पारितोषिक रोख रक्कम १ हजार, तसेच प्रत्येकी सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व सहभागींनाही सहभागाचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण शुक्रवारी माऊली संपर्क कार्यालयात पार पडले. कार्यक्रमाला तालुकाप्रमुख बापू आयरे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख रश्मीताई गोखले, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विनोद झगडे, पंचायत समितीचे माजी सदस्य राकेश शिंदे, उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, अंकुश आवले, विनोद पिल्ले, भाऊ भाटकर, सुधाकर सकपाळ, सुकन्या चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेचे आयोजक आणि शहर शिवसेनेचे प्रमुख उमेशदादा सकपाळ यांनी केले. गेल्या अकरा वर्षांपासून नवरात्रोत्सवात माता भगिनींसाठी नवदुर्गा दर्शनाची बस व्यवस्था सुरू असून यंदाही दररोज १० ते १५ बसेस सोडण्यात आल्या, अशी माहिती त्यांनी दिली. यावर्षी गणेशोत्सव सजावट स्पर्धा उशिराने घोषित झाली असली, तरी पुढील वर्षी ती भव्य स्वरूपात आणि तालुकास्तरावर घेण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.
महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख रश्मीताई गोखले यांनी उमेशशेठ सकपाळ यांच्या सामाजिक, कला व क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. माजी सभापती विनोद झगडे यांनी सकपाळ यांच्या कार्यशैलीचा उल्लेख करत, त्यांना चिपळूण नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदाची संधी मिळावी व त्या संधीचे ते सोनं करतील, असा विश्वास व्यक्त केला. तालुकाप्रमुख संदेश आयरे यांनी स्पर्धेचे कौतुक करत पुढील वर्षी ती तालुकास्तरावर घेण्याची सूचना मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश बांडागळे यांनी, तर आभार उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण यांनी मानले.
