अध्यक्षपदी डॉ. विकास शेट्ये यांची फेरनिवड
- by Yogesh Bandagale
- April 09, 2026
- 45 views
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाज सेवा संस्था यांच्या पंचवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी डॉ. विकास शेट्ये (मंडणगड) यांची फेरनिवड करण्यात आली आहे. ही निवडणूक ८ एप्रिल २०२६ रोजी लांजा येथील गणेश मंगल कार्यालयात पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत बिनविरोध झाली.
या निवडणुकीत उपाध्यक्षपदी हेमंत शिरगावकर (चिपळूण), सचिवपदी श्रीनाथ खेडेकर (चिपळूण) आणि खजिनदारपदी नरेंद्र बेलवलकर (चिपळूण) यांची निवड करण्यात आली. सहसचिवपदी समीर पाटणे (खेड) आणि सहखजिनदारपदी नंदकुमार थरवळ (गुहागर) यांचीही बिनविरोध निवड झाली.
महिला अध्यक्षपदी सौ. स्मिता लाड (देवरुख) यांची निवड करण्यात आली असून युवक अध्यक्षपदी श्रीनाथ खेडेकर आणि युवक उपाध्यक्षपदी अॅड. महेश नकाशे (राजापूर) यांची निवड झाली.
याशिवाय संस्थेच्या १७ संचालकपदी विविध तालुक्यांतील प्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये मंडणगड, खेड, दापोली, चिपळूण, संगमेश्वर, देवरुख, लांजा, रत्नागिरी, राजापूर आणि गुहागर येथील सदस्यांचा समावेश आहे.
निमंत्रित पदाधिकाऱ्यांमध्ये माधव शेट्ये (दापोली), श्रीकृष्ण जागुष्टे (देवरुख), प्रदीपकुमार बेंडखळे (लांजा), अनंत कोलते (राजापूर) आणि प्रभाकर कोळवणकर (लांजा) यांचा समावेश आहे. तसेच तालुकास्तरीय अध्यक्षांना सल्लागार म्हणून समितीत स्थान देण्यात आले आहे.
निवडणूक प्रक्रिया संस्थेचे सचिव माधव शेट्ये यांनी पार पाडली. या सभेच्या यशस्वी आयोजनासाठी विजय खवळे, प्रदीपकुमार बेंडखळे, यशवंत पाडावे, प्रभाकर कोळवणकर आणि विकास शेट्ये यांनी विशेष परिश्रम घेतले.
नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी नव्या कार्यकारिणीकडून समाजकार्यास नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
