नगराध्यक्ष पदाच्या पराभवाबाबत लियाकत शाह यांची पहिली प्रतिक्रिया

चिपळूण : चिपळूण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार व माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी विजयाचा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्ष निकालात त्यांना मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर प्रथमच प्रतिक्रिया देत त्यांनी पराभवाची कारणे, तसेच पुढील राजकीय वाटचालीबाबत भूमिका स्पष्ट केली.

यावेळी बोलताना लियाकत शाह म्हणाले की, “नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मला इतकी कमी मते का मिळाली, याचा मी शोध घेत आहे. यासंदर्भात जनतेशी संवाद साधून माहिती घेत आहे. मात्र, जनतेचा कौल मला मान्य आहे. चिपळूण शहराच्या विकासासाठी माझे सहकार्य यापुढेही कायम राहील.”
दरम्यान, माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेश कदम यांच्या पराभवासाठी लियाकत शाह जबाबदार असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. “शिवसेना-भाजपकडून सुपारी घेऊन रमेश कदम यांच्याविरोधात निवडणूक लढवली,” असा आरोप होत असल्याबाबत विचारले असता, शाह यांनी तो स्पष्ट शब्दांत फेटाळला.

ते म्हणाले, “मी कोणाचीही सुपारी घेतलेली नाही. कोणीही मला एक रुपयासुद्धा दिलेला नाही. कोणी असा आरोप करत असेल, तर त्यांनी शिवाजी चौकात येऊन माझ्यावर आरोप करावेत. ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ करण्यास मी तयार आहे.”
तसेच, “आमदारकी आणि खासदारकी लढवलेल्या रमेश कदम यांनी ही निवडणूक लढवणेच चुकीचे होते. त्यांच्या निर्णयामुळेच त्यांना पराभव स्वीकारावा लागला. माझ्यावरचे आरोप पूर्णतः बिनबुडाचे आहेत,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला असला तरी “मी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली असून काँग्रेस आणि उबाठा गटाच्या उमेदवारांपेक्षा मला अधिक मते मिळाली,” असा दावा त्यांनी केला. “निवडणूक म्हणजे हार-जीत असतेच. या पराभवातून बोध घेत पुढील वाटचाल ठरवणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेस पक्षातून आपले निलंबन झाले असल्याची माहिती देत, “पुढील राजकीय दिशा मी निश्चित केली असून लवकरच त्याबाबत जाहीर करेन,” असे संकेत लियाकत शाह यांनी दिले. शेवटी त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे आभार मानले.
 

संबंधित लेख