साडवलीत ‘त्विशा २.०’ आंतरमहाविद्यालयीन क्रीडा व कला स्पर्धांचा दिमाखदार समारोप

देवरुख (सुरेश सप्रे) : साडवली येथील इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने ‘त्विशा २.०’ (TVISHA 2.0 – Konkan Region) या भव्य आंतरमहाविद्यालयीन क्रीडा व कला स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था, आंबव संचलित या उपक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री रवींद्र माने यांच्या हस्ते झाले.

यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रद्युम्न माने, मीनाताई ठाकरे स्कूलचे मुख्याध्यापक बी. व्ही. नलावडे, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल खाडे, ज्ञानदीप फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुजित नागरे, सह्याद्री पॉलिटेक्निकचे विराज नरवणे, विवेक कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत ८ महाविद्यालयांतील १८३ खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. क्रिकेट स्पर्धांमध्ये संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. सामन्यांचे पंच म्हणून संगमेश्वर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या पंचांनी काम पाहिले. रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कलात्मकतेचे प्रभावी दर्शन घडवले. या स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध रांगोळीकार व मुंबई विद्यापीठ गोल्ड मेडलिस्ट विलास रहाटे यांनी केले.

स्पर्धेचे निकाल :

क्रिकेट (मुले) : श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, तोंडवली – विजेता; यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी – उपविजेता.

क्रिकेट (मुली) : गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी, सावर्डे – विजेता; विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, कणकवली – उपविजेता.

रांगोळी स्पर्धा : इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, साडवली – प्रथम; यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी – द्वितीय.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अजिंक्य मोरे व त्यांच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर सहकाऱ्यांनी प्राचार्य डॉ. अमोल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष परिश्रम घेतले. उपक्रमाच्या यशासाठी प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्याध्यक्ष सौ. नेहा माने यांनी विशेष मार्गदर्शन केले.

तसेच APTI महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व डी. वाय. पाटील स्कूल ऑफ फार्मसी, नवी मुंबईचे प्राचार्य डॉ. राकेश सोमाणी, डॉ. संदीप झिने (एक्झिक्युटिव्ह कौन्सिल मेंबर, APTI MS तसेच SVKM’s भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ फार्मसी, मुंबई येथील सहयोगी प्राध्यापक) आणि सर्व सहभागी महाविद्यालयांचे प्राचार्य व शिक्षक समन्वयक यांचे संस्थेच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.

संबंधित लेख