विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा, मेहनत, आदर व समाजासाठी देण्याची वृत्ती जोपासावी : विशाल चितळे
- by Yogesh Bandagale
- December 24, 2025
- 86 views
डीबीजे महाविद्यालयात ‘उडान – युवा मनाची’ महोत्सवात प्रतिपादन
चिपळूण : नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या साठ वर्षांच्या यशस्वी वाटचालीत विद्यार्थी, शिक्षक, संचालक व कर्मचारी या सर्वांचे योगदान अत्यंत मोलाचे असून डीबीजे महाविद्यालयाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारी अनेक रत्ने घडवली आहेत. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणा, कठोर मेहनत, लहान-थोरांचा आदर आणि समाजाला काहीतरी परत देण्याची वृत्ती ही चार मूलभूत तत्त्वे पाळली, तर यश नक्कीच मिळते, असा विश्वास प्रॉडक्ट ओनर व सोल्युशन्स आर्किटेक्ट (सॉफ्टवेअर) श्री. विशाल चितळे यांनी व्यक्त केला.
येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयात ‘उडान – युवा मनाची २०२५’ या महोत्सवाअंतर्गत वार्षिक शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी श्री. सौरभ हिर्लेकर (सिनिअर सेल्सफोर्स डेव्हऑप्स आर्किटेक्ट, पर्सिस्टंट सॉफ्टवेअर, पुणे) आणि श्री. विशाल चितळे (प्रॉडक्ट ओनर व सोल्युशन्स आर्किटेक्ट) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी केले.
या वेळी बोलताना श्री. विशाल चितळे म्हणाले की, “Knowledge is inter-related”- ज्ञान हे एकमेकांशी जोडलेले असते. यशस्वी विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांना घडवणाऱ्या प्राध्यापकांचेही कौतुक करणे आवश्यक आहे. आज भारताने आयटीसह विविध क्षेत्रांत मोठी झेप घेतली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची जागतिक प्रतिमा उजळली आहे. जर्मनीसह इतर देशांत जाताना भारतीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला दिसतो, हे देशासाठी अभिमानास्पद आहे. विद्यार्थी जीवनात मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सातत्याने प्रयत्नांची पायरी चढत राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे श्री. सौरभ हिर्लेकर यांनीही आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, यश हे परिस्थितीवर नव्हे, तर पूर्णपणे स्वतःवर अवलंबून असते. लोकांच्या टीका-प्रशंसांकडे संतुलित दृष्टीने पाहावे, स्वतःला वेळ द्यावा, जीवनात कोणताही शॉर्टकट नसतो. तंत्रज्ञान हे केवळ साधन आहे, मानवी बुद्धिमत्तेला त्याचा पर्याय नाही.
या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. प्रकाश मारुती जोशी, चेअरमन श्री. मंगेश तांबे, सचिव श्री. अतुल चितळे यांनीही मनोगत व्यक्त केले. संस्थेचे सचिव श्री. अतुल चितळे यांनी विद्यार्थी जीवनात अभ्यासाला पर्याय नसल्याचे सांगितले. महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा, तसेच आयएसओ मानांकन प्राप्त झाले असून, नव्याने सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांची माहिती प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी दिली.
प्रा. अनिल पुनवतकर यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. कनिष्ठ महाविद्यालयीन पारितोषिकांची घोषणा प्रा. शुभांगी इंगळे यांनी, तर वरिष्ठ महाविद्यालयीन पारितोषिकांची घोषणा प्रा. डॉ. ऋचा खवणेकर यांनी केली. ऑलिम्पियाड व टेल कार्यक्रम पारितोषिकांची घोषणा प्रा. सौ. प्राजक्ता चितळे यांनी केली. मानसशास्त्र व इतिहास विभागातील गौरव प्रा. ऐश्वर्या माळवे व डॉ. ज्ञानोबा कदम यांनी जाहीर केले. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी गौरव व डीबीजे गौरव यांची घोषणा प्रा. सौ. स्नेहल कुलकर्णी यांनी केली.
कार्यक्रमाला संस्थेचे खजिनदार श्री. संजीव खरे, नियामक समिती सदस्य श्री. अविनाश जोशी, श्री. नयनीश गुढेकर, श्री. निलेश भुरण, बक्षीसप्राप्त विद्यार्थी, पालक, पत्रकार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. कोंडीराम सावरे व प्रा. श्वेता चितळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन कु. श्रद्धा केतकर हिने केले.
