विक्रांत जाधव यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
- by Yogesh Bandagale
- October 15, 2025
- 171 views
मुंबई (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी नुकतीच नियुक्ती झाल्यानंतर उत्तर रत्नागिरी भागातील चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड आणि गुहागर या तालुक्यांतील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन श्री. विक्रांत जाधव यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री. उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
या प्रसंगी युवासेना प्रमुख व शिवसेना नेते श्री. आदित्यजी ठाकरे हेही उपस्थित होते. बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आगामी निवडणुकांत एकजुटीने काम करून पक्षाला बळकट करण्याचे आवाहन केले. त्यांनी प्रत्येक स्तरावर कार्यकर्त्यांनी जनतेशी जोडलेले राहावे आणि शिवसेनेच्या विचारधारेचा प्रसार करावा, असा संदेश दिला.
विक्रांत जाधव यांनी या भेटीत बोलताना सांगितले, “लहान वयात जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी आपण दिलीत, त्यामुळे त्या कालावधीत चांगले आणि ठळक काम करता आले. आता पुन्हा एकदा लहान वयात जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिल्याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून पक्षाच्या संघटनात्मक वृद्धीसाठी कार्यरत राहीन,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या भेटीत पाचही तालुक्यांचे प्रमुख, त्यांचे सहकारी, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी, तसेच मुंबई आणि पुण्यातील अनेक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीकरणाला नवी गती मिळेल, अशी प्रतिक्रिया पक्षातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
