अंगात कला आणि मेहनतीची तयारी असल्यास जगात कुठेही नाव कमवता येते: अभिनेत्री वेदवती केतकर

चिपळूण : टीमवर्कमध्ये काम करणे हे  सांस्कृतिक विभागामध्ये सहभाग घेतल्याने  शिकता येते. डी.बी.जे. कॉलेजने नेहमीच कलेचा सन्मान केला आहे. मी नोकरी सांभाळून गायन क्षेत्रात काम केले. अंगात कला आणि मेहनतीची तयारी असेल तर जगात कुठेही नाव करता येते. संगीत नाट्य ही आपली अभिजात कला आहे. तिचा गौरव करायला हवा, असे विचार अभिनेत्री आणि शास्त्रीय गायिका तसेच डी.बी.जे. महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी श्रीमती वेदवती केतकर यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयाच्या सांस्कृतिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी व्यक्त केले. आपल्या मनोगताचा शेवट त्यांनी गायलेल्या ‘डीबीजे  अभिमान’ गीताने केला.

यावेळी डीबीजेचेच माजी विद्यार्थी, अभिनेते सचिन कांबळे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी संस्थेचे चेअरमन श्री.मंगेश तांबे, नियामक समिती सदस्य सौ धनश्री बापट,प्राचार्य डॉ. माधव बापट, वार्षिक स्नेहसंमेलन समिती प्रमुख प्रा.अनिल पुनवतकर, वरिष्ठ महाविद्यालयाच्या  सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. राहुल पवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. कांचन चिले व  विद्यार्थी प्रतिनिधी  मंचावर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी केले. मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. बापट महाविद्यालयाच्या स्वयात्तता मिळवल्यानंतर आलेल्या विविध अभ्यासक्रमाची माहिती दिली.सांस्कृतिक विभागाच्या विविध कलाप्रकारातील यशस्वी कामगिरीचा आढावा घेतला.नियामक समिती सदस्य सौ धनश्री बापट यांनी आपल्या मनोगतात सांस्कृतिक विभाग नावलौकिकास साजेसे काम करत आहे याचा आम्हाला अभिमान आहे असे मत व्यक्त केले.

अभिनेते सचिन कांबळे यांनी आपल्या कॉलेज जीवनातील  जुन्या आठवणींना उजाळा दिला. हा क्षण अविस्मरणीय आहे. या कॉलेजने ओळख मिळवून दिली हे कायम स्मरणात राहील, असे मत मांडले.  डीबीजे ने पाया भक्कम केला. ‘ओम श्वानाय नम:’ या  एकांकीकेने नाव मिळवून दिले. एका वेबसिरीजमध्ये महत्त्वाची भूमिका मिळवायला मला १८ वर्षे लागली. त्यामुळे अभिनयाच्या क्षेत्रात यायचे असेल तर  संयम ठेवला पाहिजे, न डगमगता प्रयत्न  केले पाहिजे, तसेच न थांबता प्रयत्न करत राहिले पाहिजे, असे मत सचिन कांबळे यांनी आपल्या मनोगतात मांडले.

या नंतर कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या अहवालाचे वाचन प्रा. सौ. कांचन चिले यांनी केले, तर प्रा. राहुल पवार यांनी वरिष्ठ महाविद्यालयाच्या अहवालाचे वाचन केले. शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व सांस्कृतिक विभागातील यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्रे व  आकर्षक चषक देवून सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला सचिव श्री अतुल चितळे, नियामक समिती सदस्य अविनाश जोशी,नयनीश गुढेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस.आर. भादुले आणि प्रा. सौ. ए.व्ही. जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार विद्यार्थी प्रतिनिधी सुशील कांबळे यांनी मानले.

संबंधित लेख