खेर्डी चिंचघरी सती विदयालयात गणित सेल्फी पॉईंट बनला विद्यार्थ्यांचे आकर्षण

चिपळूण : सह्याद्री शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर कॉलेज खेर्डी चिंचघरी सती विद्यालयात राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विदयालयात गणित सेल्फी पॉईंट हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. विदयालयाच्या तंत्रस्नेही, उपक्रमशील व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक कु.शर्मिला शिवराम म्हादे यांच्या संकल्पनेतून ‘गणित सेल्फी पॉईंट’ साकारण्यात आला. उभारण्यात आलेला गणित सेल्फी पॉईंट विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरला. गणित विषयाबद्दल गोडी निर्माण व्हावी,विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढावी आणि शिकण्याचा अनुभव आनंददायी व्हावा या उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.

या गणित सेल्फी पॉईंटमध्ये प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन,विविध गणिती चिन्हे, सूत्रे,कोडी,आकृत्या तसेच प्रेरणादायी सुविचार आकर्षक पद्धतीने मांडण्यात आले होते.रंगीबेरंगी फलक, सर्जनशील सजावट आणि शैक्षणिक आशय यामुळे हा सेल्फी पॉईंट विद्यार्थ्यांच्या विशेष पसंतीस उतरला.
विद्यार्थ्यांनी मित्रांसोबत आणि शिक्षकांसोबत या गणित सेल्फी पॉईंटवर फोटो काढून आनंद व्यक्त केला.अनेक विद्यार्थ्यांनी गणित विषयाबद्दलची भीती कमी झाली असून गणित शिकणे मजेशीर वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर यांनी सांगितले की, अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढतो तसेच गणित विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

एकूणच,गणित सेल्फी पॉईंट हा केवळ फोटो काढण्याचा कोपरा न राहता गणित शिकण्याचा आनंददायी अनुभव ठरला असून विद्यार्थ्यांच्या मनात गणिताविषयी प्रेम निर्माण करणारा उपक्रम म्हणून तो यशस्वी ठरला आहे.गणित सेल्फी पॉईंटमुळे राष्ट्रीय गणित दिनाचा उत्सव अधिक रंगतदार झाला असून “शिका, समजा आणि आनंद घ्या” हा संदेश प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला.


या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात सौ.स्मिता भालेकर यांचे मोलाचे व प्रेरणादायी योगदान लाभले.

संबंधित लेख