दिशा दाभोळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
- by Yogesh Bandagale
- January 20, 2026
- 255 views
चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील खेर्डी जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रत्नागिरी जिल्हा बँकेच्या संचालिका व माजी जिल्हा परिषद सदस्या दिशा दशरथ दाभोळकर यांनी, तर खेर्डी पंचायत समिती गणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व पंचायत समितीचे माजी सभापती सदस्य नितीन उर्फ आबू ठसाळे यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांच्याकडे दाखल केला.
दिशा दाभोळकर या पेशाने इंजिनीअर असून त्यांनी यापूर्वी शिक्षिका म्हणूनही काम केले आहे. मागील पाच वर्षांच्या जिल्हा परिषद सदस्य कार्यकाळात त्यांनी आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून खेर्डी परिसरात विविध विकासकामे प्रभावीपणे राबवली आहेत. त्यांच्या पती दशरथ दाभोळकर हे खेर्डीचे माजी सरपंच व यशस्वी उद्योजक असून त्यांची त्यांना भक्कम साथ लाभत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून दिशा दाभोळकर यांनी पक्षाचे भक्कम संघटन उभे केले असून सध्या त्या रत्नागिरी जिल्हा बँकेच्या संचालिका म्हणून कार्यरत आहेत. राजकारण, समाजकारण, सहकार, कला व क्रीडा अशा विविध क्षेत्रांत त्या सक्रियपणे कार्यरत असून सर्वसामान्य जनतेत त्यांची मजबूत पकड आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना अनिलशेठ दाभोळकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सध्या मतदार संघात त्यांना वाढता प्रतिसाद मिळत असून त्यांचा विजय निश्चित मानला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
