परचुरीतील नववधू प्रियंका वेल्येचा लोकशाहीचा आदर्श
- by Yogesh Bandagale
- February 07, 2026
- 103 views
संगमेश्वर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परचुरी गावात लोकशाहीप्रती जागरूकतेचे एक अत्यंत प्रेरणादायी आणि भावनिक उदाहरण सोमवारी पाहायला मिळाले. सर्वसामान्य नागरिकांसाठी मतदान हा केवळ हक्क नसून कर्तव्य आहे, हा ठाम संदेश देत परचुरी येथील नवविवाहिता प्रियंका भार्गव वेल्ये हिने आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाच्या दिवशी—लग्नाच्या दिवशीच—थेट मतदान केंद्र गाठून मतदानाचा हक्क बजावला.
परचुरी येथील प्रियंका भार्गव वेल्ये यांचा विवाह रुपेश खाडे यांच्याशी पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात पार पडला. मंगलाष्टका, वाजत-गाजत झालेला विवाह सोहळा, नातेवाईकांचा जल्लोष, फोटोसेशन आणि शुभेच्छांचा वर्षाव या सर्व आनंदाच्या क्षणांमध्येही प्रियंकाने एक गोष्ट मनाशी पक्की ठेवली होती—“आज मतदानाचा दिवस आहे.”
विवाह सोहळा आटोपताच कुठलाही विलंब न करता, नवरीचा साज परिधान केलेल्या अवस्थेतच प्रियंकाने थेट परचुरी शाळा क्रमांक ३ येथील मतदान केंद्र गाठले. हातावर मेहंदी, चेहऱ्यावर नववधूचे तेज आणि मनात लोकशाहीप्रती निष्ठा अशा अवस्थेत तिने मतदान केंद्रात प्रवेश केला. हा क्षण मतदान अधिकारी तसेच उपस्थित नागरिकांसाठीही भारावून टाकणारा ठरला.
लग्नाचा आनंद मोठा असला तरी लोकशाहीतील आपले कर्तव्य त्याहून मोठे आहे, असा स्पष्ट संदेश प्रियंकाने आपल्या कृतीतून दिला. तिच्या या निर्णयामुळे मतदान केंद्रावर काही क्षण भावनिक वातावरण निर्माण झाले. अनेक मतदारांनी तिला अभिनंदन करत तिच्या कृतीमुळे मतदानासाठी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली.
विशेष म्हणजे, प्रियंका वेल्ये या परचुरी गणातील शिवसेनेच्या उमेदवार शर्वरी वेल्ये यांच्या नणंद आहेत. राजकीय वातावरण तापलेले असतानाही नातेसंबंध, वैयक्तिक आयुष्य आणि लग्नसोहळ्यापलीकडे जाऊन प्रियंकाने लोकशाहीला दिलेले प्राधान्य नागरिकांच्या मनात ठसले आहे.
लग्नाच्या दिवशीही मतदानाला सर्वोच्च प्राधान्य देत तिने लोकशाहीप्रती असलेली जबाबदारी जपली. तिच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून सोशल मीडियावरही हा प्रसंग चर्चेचा विषय ठरत आहे. “प्रत्येक मत महत्त्वाचे आहे” हे वाक्य केवळ घोषवाक्य न राहता प्रत्यक्ष कृतीतून साकार झाले आहे.
हा प्रसंग केवळ परचुरीपुरता मर्यादित न राहता, मतदानापासून दूर राहणाऱ्या मतदारांसाठी आरसा दाखवणारा ठरला आहे. आज अनेकजण लग्न, काम, प्रवास किंवा “वेळ नाही” अशी कारणे देत मतदान टाळतात; मात्र लग्न मंडपातून मतदान केंद्रापर्यंतचा प्रियंकाचा प्रवास हा लोकशाहीचा खरा विजय ठरल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
