हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रताप व शिवाली परब यांचे स्वागत

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ‘मनोरंजनातून ग्रामविकास’ या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यानिमित्ताने महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम विनोदी कलाकार पृथ्वीक प्रताप व शिवाली परब यांनी कडवई गावास भेट दिली. त्यांच्या आगमनाने संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात कडवई गावाने सक्रिय सहभाग नोंदवला असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून ग्रामविकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अभियानासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, गटविकास अधिकारी आनंद लोकरे आणि सहायक गटविकास अधिकारी विनोद शिंदे यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे.

या उपक्रमाअंतर्गत प्रशासनाच्या वतीने पृथ्वीक प्रताप व शिवाली परब यांनी कडवई गावास भेट दिली. गावाच्या सीमेवरील तुरळफाटा येथे ढोल-ताशे व लेझीम पथकाच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी दोन्ही कलाकारांनी स्वतः लेझीम खेळून उपस्थितांची मने जिंकली.

यानंतर कडवई बाजारपेठेत महाराष्ट्र उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कलाकारांच्या उपस्थितीत प्रभावी पथनाट्य सादर केले. तसेच भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांनीही स्वागत कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

यावेळी पृथ्वीक प्रताप व शिवाली परब यांनी कडवई गावाला या अभियानात उज्ज्वल यश मिळो, अशा शुभेच्छा देत ग्रामविकासाच्या उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमास ग्रामस्थ, विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते कडवई ग्रामपंचायत येथे सौरऊर्जेवरील पथदीप योजनेचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, सहायक गटविकास अधिकारी विनोद शिंदे, सरपंच विशाखा कुवळेकर, ग्रामधिकारी राहुलकुमार चौधरी, उपसरपंच दत्ताराम ओकटे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच संतोष थेराडे, जितेंद्र चव्हाण, राजेंद्र सुर्वे, राजन कापडी, वसंत उजगावकर आदींनी उपस्थित राहून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख