पंचायत समितीतील लिपिक अरविंद पवार यांचे निधन

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावचे सुपुत्र व देवरूख पंचायत समिती कार्यालयातील लिपिक अरविंद भागुराम पवार यांचे शनिवारी दुपारी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते. त्यांच्या अचानक निधनामुळे देवरूखसह संगमेश्वर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

अरविंद पवार हे अत्यंत प्रेमळ, मनमिळाऊ आणि सहकार्यशील स्वभावाचे कर्मचारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या सेवाकारकिर्दीची सुरुवात देवरूख येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागात झाली होती. त्यानंतर त्यांची पंचायत समिती कार्यालयात सामान्य प्रशासन विभागात लिपिक म्हणून बदली झाली होती. सध्या ते याच विभागात कार्यरत होते.

शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजता ते हातीव येथील देवराई परिसरात त्यांनी विकत घेतलेली जमीन पाहण्यासाठी गेले होते. मात्र दुपार झाली तरी ते घरी जेवण्यासाठी न आल्याने पत्नीने त्यांना फोन केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. अखेर पत्नी स्वतः हातीव देवराई येथे गेल्या असता अरविंद पवार निपचित अवस्थेत पडलेले आढळून आले. तत्काळ त्यांना देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

त्यांच्या निधनाची बातमी समजताच देवरूख परिसरातील नागरिक, सहकारी कर्मचारी व नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली. त्यांच्या अकाली निधनाने एक सुस्वभावी, कर्तव्यनिष्ठ कर्मचारी गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक भाऊ, एक बहीण, पुतणे असा परिवार आहे. त्यांच्यावर रविवारी सकाळी १०.३० वाजता मारळ या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संबंधित लेख